नांदेड जिल्ह्यात अवघा ९.३५ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:05 AM2019-04-27T01:05:04+5:302019-04-27T01:05:33+5:30
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे साठ्यात वेगाने घट होत आहे.
नांदेड : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे साठ्यात वेगाने घट होत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा १०६ प्रकल्पांत मिळून केवळ ९.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.
नांदेड जिल्ह्यात १०६ प्रकल्प आहेत. यात मानार आणि विष्णूपुरी या प्रकल्पांकडे मोेठे प्रकल्प म्हणून पाहिले जाते. मानार प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता १४६.९२ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात २१.८७ दलघमी म्हणजेच १५.८२ टक्के पाणी उपलब्ध आहे. विष्णूपुरी प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता ८३.५५ दलघमी आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ८.८३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून या पाण्याची टक्केवारी १०.९३ इतकी आहे. जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता १७९.९८ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांत ८.७३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६.२८ इतकी आहे. तर जिल्ह्यातील ३ उच्च पातळी बंधाऱ्यांची पूर्ण जलक्षमता १२१.७० दलघमी आहे. सद्य:स्थितीत या तीन बंधाऱ्यांत ७.६३ दलघमी उपयुक्त पाणी असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६.३९ इतकी आहे. जिल्ह्यात ८८ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता २१६.४५ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या ८८ प्रकल्पात केवळ १६.०८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून ही टक्केवारी ८.४१ एवढी आहे. तर जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या चारही बंधा-यात सध्या ठणठणाट आहे.