नांदेड जिल्हा बँकेसाठी ९८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:14 AM2021-04-03T04:14:50+5:302021-04-03T04:14:50+5:30
जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत रविवारी जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये सकाळी १० वाजेपर्यंत ...
जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत रविवारी जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये सकाळी १० वाजेपर्यंत ३५.५३ टक्के मतदान झाले होते. ३३४ मतदारांनी सकाळी १० वाजेपर्यंत आपला हक्क बजावला होता. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण ७६.२७ टक्क्यांपर्यंत पोहोचले, तर दुपारी १२ ते २ या वेळेत ९५.३१ टक्के आणि दुपारी ४ वाजता मतदानाची अंतिम टक्केवारी ९७.९८ टक्क्यांवर पोहोचली. रविवारी झालेल्या मतदानात कंधार, धर्माबाद, हदगाव, भोकर, मुखेड आणि माहूर तालुक्यात १०० टक्के मतदान झाले.
जिल्हा बँकेसाठी मुदखेड तालुक्यात ४४ पैकी ४२ मतदारांनी मतदान केले. अर्धापूर तालुक्यात २९ पैकी २८, कंधार तालुक्यात ७० पैकी ७०, लोहा तालुक्यात ७१ पैकी ५९, बिलोली तालुक्यात ६३ पैकी ६१, नायगाव तालुक्यात ८३ पैकी ८१, देगलूर तालुक्यात ९२ पैकी ९०, धर्माबाद तालुक्यात १० पैकी १०, हदगाव तालुक्यात ७५ पैकी ७५, भोकर तालुक्यात ४९ पैकी ४९, उमरी तालुक्यात ५५ पैकी ५१, मुखेड तालुक्यात ६७ पैकी ६७, किनवट तालुक्यात ७० पैकी ६९, माहूर तालुक्यात २५ पैकी २५ आणि नांदेड तालुक्यात १३७ पैकी १३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात ९४० पैकी ९५१ मतदारांनी मतदान केले. त्यात ७८० मतदार पुरुष होते, तर १४१ महिला मतदारांनी जिल्हा बँकेसाठी आपला हक्क बजावला.
या निवडणुकीत खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात ललिताबाई शिंदे, माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर यांच्या विरोधात वसंतराव चव्हाण, माजी आ. हनमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या विरोधात गंगाधर राठोड, कंधारमध्ये प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या विरोधात माधवराव पांडागळे, उमरीमध्ये कैलास देशमुख गोरठेकर यांच्या विरोधात संदीप कवळे, किनवटमध्ये दिनकर दहीफळे यांच्या विरोधात सुरेश रंगेनवार यांच्यात सामना होत आहे. त्याचवेळी महिला राखीव प्रवर्गातही थेट लढती होत असून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या सौभाग्यवती डॉ. शीला कदम यांच्या विरोधात संगीता पावडे या रिंगणात आहेत. हिमायतनगरमध्ये अनुराधा पाटील विरुद्ध विजयाबाई शिंदे, दिलीप कंदकुर्ते विरुद्ध शिवराम लुटे, इतर मागासवर्गीय प्रवर्गात हरिहरराव भोसीकर विरुद्ध उमाकांत गोपछडे अशा लक्षवेधी लढती झाल्या आहेत.
चौकट——————-
उद्या निकाल
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल ४ एप्रिल रोजी लागणार आहे. नांदेड उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात रविवारी मतमोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या निकालाचे चित्र दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. या निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब पाटील रावणगावकर, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर आणि भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. १८ संचालकांच्या भवितव्याचा फैसला रविवारी होणार आहे. त्यात खा. प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, दिलीप कंदकुर्ते, लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. शीला कदम, दिनकर दहीफळे, हरिहरराव भोसीकर या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.