लैंगिक अत्याचाराने सहावीतल्या मुलाला बसला मानसिक धक्का; शाळा बंद, जेवण सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 05:49 PM2024-11-01T17:49:26+5:302024-11-01T17:49:37+5:30
शेजारीच राहत असलेल्या दहावीतील मुलाने संधी साधत सहावीतील मुलाच्या घरी येऊन धमकावित केले लैंगिक अत्याचार.
नांदेड : साधारणता मुलींवर लैंगिक अत्याचार केले जातात असा समज आहे. परंतु नुकतेच एका घटनेत सहावीतील मुलावर त्याच्या शेजारीच राहत असलेल्या दहावीतील मुलाने तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे मुलाला मानसिक धक्का बसला होता. शाळेत जाणेही बंद केले होते. तसेच जेवणही सोडले होते. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेतली. त्यावेळी मुलाने आपबिती सांगितल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. सध्या या मुलावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत.
मुलाचे आई आणि वडील हे दोघेही शासकीय कर्मचारी आहेत. त्यामुळे सकाळीच ते कामावर निघून जातात. मुलगा दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर एकटाच असतो. मुलगी असल्यास आई-वडील विशेष काळजी घेतात. परंतु मुलगा असल्यामुळे त्याला कोण करणार? अशी भावना असते. परंतु हीच संधी साधून शेजारीच राहत असलेल्या दहावीतील मुलाने पीडित मुलाच्या घरी येऊन धमकावित त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे मुलाला मानसिक धक्का बसला. झोपेत अचानक दचकणे, शाळेत जाण्यास नकार, खाणे-पिणे सोडणे अशी लक्षणे त्याच्या दिसून आली. त्यानंतर कुटुंबीयांनी लगेच मानसोपचार तज्ज्ञाकडे धाव घेतली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आजघडीला या मुलावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत.
मुलांनाही लैंगिक शिक्षणाची गरज
मुलीच लैंगिक अत्याचाराला बळी पडतात असा अनेकांचा समज आहे. परंतु मुलांसोबतही अत्याचाराच्या घटना घडतात. त्यामुळे मुलींसोबत मुलांनाही लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे. समाजात घडणाऱ्या वाईट प्रवृत्तीची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा घटना टाळता येतील. त्यासाठी पालकांनी अधिक जागरुक राहण्याची गरज आहे. -डॉ. रामेश्वर बाेले, मानसोपचार तज्ज्ञ