हाताची पट्टी काढताना ७ दिवसांच्या बाळाचा चक्क अंगठाच तोडला; खाजगी दवाखान्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 04:00 PM2023-10-26T16:00:59+5:302023-10-26T16:02:35+5:30
संतप्त नातेवाईकांचा रूग्णालयात गोंधळ
कंधार ( नांदेड) : घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाल्याने खुश असलेल्या भुत्ते कुटुंबियाला विचित्र प्रकाराला सामोरे जावे लागले. रूग्णालयात बाळांतपण झाल्यानंतर सुटी मिळाल्याने सात दिवसीय चिमुकल्याच्या हाताची सुई काढण्यास सांगितले. परंतु, सुईची पट्टी कापत असताना चक्क बाळाचा अंगठा कापला गेला. हा धक्कादायक प्रकार कंधार येथील एका खासगी रूग्णालयात घडला.
तालुक्यातील उमरज येथील आकाश भुत्ते यांनी आपल्या पत्नीला बाळांतपणासाठी काही दिवसांपूर्वी कंधार शहरातील सिद्धार्थनगर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. बाळांतपण झाले, मुलगा झाला अन् बाळ आणि आईची प्रकृती चांगली असल्याने भुत्ते कुटुंबाला आनंद गगनात मावेनासा झाला. सातव्या दिवशी त्यांना सुटी देण्यात आली. सलाईन, इंजेक्शन देण्यासाठी बाळाच्या हाताला सुई लावण्यात आली होती. सुटी झाल्याने सदर सुई काढण्याची विनंती नातेवाईकांनी केली. त्यानूसार खासगी रूग्णालयात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने २३ रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान पट्टी काढायला सुरूवात केली.पट्टी निघत नसल्याने ती कापून काढतांना चक्क बाळाच्या डाव्या हाताचा अंगठाच कापून काढला. हा धक्कादायक प्रकार भुत्ते कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एकच गोंधळ घातला. दरम्यान, बाळाला नांदेड येथील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.
तद्नंतर २४ ऑक्टोबर रोजी बाळाचे वडील आणि त्यांचे नातेवाईक घडल्या प्रकाराबद्दल जाब विचारायला कंधारमधील रूग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांची गर्दी पाहून तेथील डाॅक्टरांनी कंधार पोलिसांनाही पाचारण केले.काही ज्येष्ठ नागरिक व पोलिसांच्या मदतीने यावर तोडगा काढण्यात आला. चुकीमुळे जी गोष्ट घडून गेली, ती परत तर येणार नाही म्हणून पुढील खर्चासाठी लागणारी जी मदत आहे, ती डॉक्टरांनी द्यावी, असा तोडगा काढून प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.
वैद्यकीय ज्ञान नसलेला कर्मचारी स्टाफ
डेंग्यू, मलेरिया, तापाच्या रूग्णांनी रूग्णालये भरली आहेत. मात्र, कंधारमधील रूग्णालयात सर्रासपणे दहावी, बारावी झालेला स्टाफ आहे. हा प्रकार म्हणजे रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यांना कुठलेही वैद्यकीय ज्ञान नाही.