अंध दाम्पत्याचा डोळस आधार हिरावला; अपहरण झालेल्या चिमुकलीचा मृतदेह आढळला
By शिवराज बिचेवार | Published: August 19, 2022 08:41 PM2022-08-19T20:41:15+5:302022-08-19T20:45:17+5:30
अंध दाम्पत्य रेल्वेत चिप्स विकून करतात उदरनिर्वाह, डोळस चिमुकलीचा होता एकमेव आधार
नांदेड- जन्मताच पती-पत्नी दोघेही अंध. त्यांच्या पोटी जन्मलेली चिमुकली हाच त्यांचा डोळस आधार. तिच्या डोळ्यांनीच हे दाम्पत्य जग पाहत होते. परंतु काळाने तो आधारही हिरावून घेतला. तीन दिवसापूर्वी सायंकाळी घरासमोरुन अपहरण केलेल्या या सहा वर्षीय चिमुकलीचा शुक्रवारी गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील तेहरानगर भागात शासकीय संकुलातील इमारत क्रमांक ७ मध्ये गेल्या दोन वर्षापासून अंकुश हट्टेकर आणि शितल हट्टेकर हे अंध दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना पावणे सहा वर्षाची आरोही ही डोळस मुलगी आहे. पती-पत्नी दोघेही अंध असल्यामुळे मुलगी आरोही हाच त्यांचा आधार होती. तिच्या डोळ्यानेच अंध पती-पत्नी जग पाहत होते. परंतु १६ ऑगस्टच्या सायंकाळी घरासमोर खेळत असलेली आरोही अचानक बेपत्ता झाली. अंध दाम्पत्याने इतर नातेवाईकांच्या मदतीने तिचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. परंतु सापडली नाही. रात्री बारा वाजेपर्यंत हे अंध दाम्पत्य आपल्या मुलीचा शोध घेत होते. अखेर दुसर्या दिवशी त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी या भागातील काही नागरीकांची चौकशी करुन संशयिताची चौकशीही केली होती. परंतु त्यानंतरही मुलीचा शोध लागला नाही. त्यात शनिवारी गोदावरी नदीपात्रात या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा मृतदेह आढळल्याची बातमी कळताच अंध दाम्पत्याने टाहो फोडला. अंधाऱ्या आयुष्यात मुलीच्या रुपाने एकमेव असलेला आधारही काळाने हिरावला होता. मयत मुलीवर विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु आहे.
वडील रेल्वेत विकतात पदार्थ
हट्टेकर दाम्पत्य हे अंध आहे. त्यामुळे उत्पन्नाचे त्यांच्याकडे कोणतेच साधन नाही. त्यामुळे अंकुश हट्टेकर हे रेल्वेत फिरुन चिप्स, कुरेकरे असे पदार्थ विक्री करुन आपली उपजिविका चालवितात. या कामी सहा वर्षीय चिमुकलीही त्यांना मदत करीत होती. परंतु आता तो आधारही हिरावला गेला आहे.
माझ्या लेकीला परत आणा
पोलिसांनी हट्टेकर दाम्पत्याला मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी टाहो फोडला. आई शितल यांनी माझ्या लेकीला परत आणा म्हणून हंबरडा फोडला. अंध डोळ्यातून अश्रृंच्या धाराचे पाट पाहत होते. त्यामुळे पोलिसांसह उपस्थितांचे ह्दय हेलावून गेले होते.