नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला हवा ४२० कोटींचा बुस्टर 

By प्रसाद आर्वीकर | Published: August 24, 2023 05:14 PM2023-08-24T17:14:09+5:302023-08-24T17:15:17+5:30

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाच्या नैसर्गिक आपत्ती तरतुदीतून आर्थिक मदत केली जाते.

A booster of 420 crores is needed to help those affected by heavy rains in the month of July in nanded dist | नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला हवा ४२० कोटींचा बुस्टर 

नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला हवा ४२० कोटींचा बुस्टर 

googlenewsNext

नांदेड : जुलै महिन्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्ह्याला ४२० कोटी ४६ लाख ६० हजार ८३५ रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. आता जिल्हा प्रशासन शासनाकडे या निधीची मागणी नोंदविणार आहे.

जुलै महिन्यात जिल्ह्यात दोनवेळा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे खरीप पिके वाहून गेली. तसेच जमिनी खरडून गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाच्या नैसर्गिक आपत्ती तरतुदीतून आर्थिक मदत केली जाते. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे केले. हे पंचनामे पूर्ण झाले असून, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज बांधण्यात आला आहे. जिल्ह्यात ७ लाख ९२ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची लागवड झाली आहे. त्यापैकी ४ लाख ९२ हजार ७४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ६ लाख १७ हजार ९११ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीचा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ४२० कोटी ४६ लाख ६० हजार ८३५ रुपयांची आवश्यकता प्रशासनाला आहे. त्यामुळे या रकमेची मागणी लवकरच शासनाकडे केली जाणार आहे. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे.

जिरायती शेतीसाठी सर्वाधिक निधी
खरीप हंगामातील जिरायती शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हे अल्पभूधारक, पाण्याची सुविधा नसणारे आहेत. याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टीने बाधित झाली होती. या शेतकऱ्यांसाठी ४१७ कोटी ३३ लाख ६२ हजार ८१० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. बागायती शेतकऱ्यांसाठी २ कोटी ५४ लाख ३८ हजार ८०० आणि फळ पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५८ लाख ५९ हजार २२५ रुपयांची आवश्यकता आहे.

Web Title: A booster of 420 crores is needed to help those affected by heavy rains in the month of July in nanded dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.