गावातील वादातून तरुणाची भोसकून हत्या, सात अटकेत; पोलीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:32 PM2023-06-03T19:32:03+5:302023-06-03T19:33:05+5:30
या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे
नांदेड : शहरालगत असलेल्या बोंढार तर्फे हवेली येथे वादातून तरुणाचा भोसकून खून करण्यात आला होता. ही घटना गुरुवारी रात्री घडली होती. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून त्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.
बोंढार तर्फे हवेली येथील २७ वर्षीय तरूण अक्षय भालेराव व त्यांचे भाऊ आकाश श्रावण भालेराव हे दोघे १ जून रोजी रात्री साडेसात वाजता किराणा सामान आणण्याकरिता कामाजी तिडके यांच्या दुकानावर गेले होते. त्याचवेळी नारायण विश्वनाथ तिडके यांचे लग्नाची 'वरात' सुरु होती. वरातीमध्ये सहभागी झालेले वराडी मंडळी हे 'डीजे' लावून नृत्य करत करत हातात तलवार, खंजर, लाठ्याकाठ्या घेवून मुख्य रस्त्याने ओरडत चालले होते. त्याचवेळी, आरोपी संतोष संजय तिडके हा भालेराव यांच्या अंगावर शिवीगाळ करीत धावून आला. तसेच कृष्णा गोविंद तिडके, निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके व शिवाजी दिगंबर तिडके यांनी लाठ्या-काठ्यांनी अक्षयला मारहाण केली. संतोष व दत्ता यांनी खंजरने अक्षयच्या पोटात सपासप वार केले. यावेळी आकाश हा मध्ये पडला असता महादु गोविंद तिडके, बाबूराव सोनाजी तिडके व बालाजी मुंगल त्यांनाही मारहाण झाली. आरोपींनी वस्तीवर जोरदार दगडफेक केली, असा आरोप तक्रारीत आहे.
याप्रकरणी जखमी आकाश श्रावण भालेराव यांनी २ जून रोजी दिलेल्या तक्रारीचे आधारे अखेर नांदेड ग्रामीण पोलीस नऊ आरोपींविरूध्द खून आणि ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यातील सात आरोपींना गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. आनंद बिचेवार व सहकाऱ्यांनी पकडले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव हे तपास करीत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका : एसपी
गावात गुरुवारी रात्री लग्नाची वरात सुरु असताना तरुणांमध्ये वाद झाला, त्यानंतर एका तरुणाला चाकूने भोसकण्यात आले, त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी केले.