महाशिवरात्रीनिमित्त पवित्र स्नानासाठी गेलेल्या मुलीचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 04:03 PM2022-03-01T16:03:44+5:302022-03-01T16:05:04+5:30
गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. यामुळे पात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
उमरी ( नांदेड ): महाशिवरात्रीनिमित्त बळेगाव येथील गोदावरी पात्रात पवित्र स्नानासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. शिरोमणी हनमंत होनशेट्टे ( रा. बेलदरा ता .उमरी ) असे मयत मुलीचे नाव आहे.
आज महाशिवरात्र असल्याने गोदावरी पात्रात अनेक भाविक स्नान करतात. बळेगाव येथील गोदापात्रात देखील स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. यातच बेलदरा येथील शिरोमणी होनशेट्टे ही मुलगी आपल्या वडिलांसोबत येथे स्नानासाठी आली. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. शिरोमणी बुडाल्याचे लक्षात येताच इतर भाविकांनी पोहत जाऊन तिला बाहेर काढले. मात्र, शिरोमणीचा तोपर्यंत मृत्यू झालेला होता.
अवैध वाळू उपस्याने पात्रात खड्डे
गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे. यामुळे पात्रात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामध्ये पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत आहेत. आजची दुर्घटना देखील अशाच खड्यांमुळे झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.