दरोडेखोरांच्या धुमाकुळाने रक्ताने माखले घर; दोन ठिकाणी घरफोडी, आई-मुलगा गंभीर जखमी
By प्रसाद आर्वीकर | Published: August 1, 2022 07:24 PM2022-08-01T19:24:58+5:302022-08-01T19:25:22+5:30
श्वानाने घटनास्थळापासून राष्ट्रीय महामार्गापासून कंधार रोडमार्गे दिग्रस रस्त्यापर्यंत माग काढला.
मुखेड (नांदेड) : तालुक्यातील जांब बु. येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत असून, लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन ठिकाणी घरफोडी करुन सोन्या-चांदीची दागिणे व रोख १२ हजार ५०० रुपये असा ४६ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.
जांब येथील जळकोट रोडवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागे गणपत कानगुले व शिक्षक राजेंद्र करदाळे यांची घरे आहेत. जांब बु. हे तालुक्यातील मोठे गाव आहे. १ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शिक्षक राजेंद्र करदाळे यांच्या घरात प्रवेश मिळविला. कपाट फोडून ३४ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले. करदाळे यांच्या घराच्या पुढील लाईनमध्ये असलेल्या व्यापारी व्यंकट पांपटवार यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी वरच्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला.
पाम्पटवार यांचे घर फोडण्याचा बराच वेळ प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने तोडलेले कुलूप घेऊन दरोडेखोरांनी व्यापारी गणपत कानगुले यांच्या घराकडे आपला मोर्चा वळविला. कानगुले यांचे घर दोन मजली आहे. तळमजल्यावर न जाता चोरटे थेट वरच्या मजल्यावर गेले. वरच्या मजल्यावरील घराच्या दार लाथा मारुन तोडले. आत खालीत शोभाताई कानगुले खाली झोपल्या होत्या तर पलंगावर दीपक हे झोपले होते. चोरटे आत आल्याने शोभाताई जाग्या झाल्या. चोरट्यांनी त्यांना कपाटाची चावी मागितली. मात्र त्यांनी चावी दिली नाही. त्यामुळे चोरट्यांनी त्यांना मारहाण लोखंडी राॅडने मारहाण केली. हा गोंधळ सुरू असताना दीपक जागा झाला. त्याच्या तोंडावर कुलूप फेकून मारत त्याला जखमी केले. तसेच त्यालाही लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांनी नगदी १२ हजार ५०० रुपये चोरुन घेतले. यानंतर चोरट्यांनी गंगाधर मोरे यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर चोरटे पळून गेले.
हा गोंधळ ऐकून नागरिकांनी बीट जमादार भानुदास गिते यांना फोन करुन माहिती दिली. त्यांनतर जखमी शोभाताई कानगुले (५०)आणि दीपक कानगुले (२३) यांना मुखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, दोन्ही अधिकारी मुखेड येथे तळ ठोकून आहेत. पोलीस उपनिरीक्षक किशोर बोधगिरे तपास करीत आहेत.
रक्ताने माखले घर
कानगुले यांच्या घरात सकाळी ठिकठिकाणी रक्त पडल्याचे दिसून आले. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत दीपक कानगुले याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, १० टाके पडले आहेत. तर शोभाताई यांच्या अंगावर सईचे व्रण आहेत.
चड्डी बनियनवर होते चोरटे
जांब गावात दरोडा टाकणारे चोरटे चड्डी बनियनवर होते, साधारणत: २० ते २५ वर्षे वयोगटातील हे चोरटे असावेत. पाचही जणांनी तोंडाला मास्क लावलेला होता. राष्ट्रीय महामार्गाकडून गावाच्या दिशेने चोरटे आले होते. चिखलाची पाये घटनास्थळी उमटली आहेत.
श्वान राष्ट्रीय महामार्गापर्यंत
घटनेनंतर पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने घटनास्थळापासून राष्ट्रीय महामार्गापासून कंधार रोडमार्गे दिग्रस रस्त्यापर्यंत माग काढला.