पादचारी पुलाखाली सापडले कपड्यात गुंडाळलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक; अर्धापूरमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:37 IST2025-02-06T12:35:57+5:302025-02-06T12:37:09+5:30
आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला.

पादचारी पुलाखाली सापडले कपड्यात गुंडाळलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक; अर्धापूरमध्ये खळबळ
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड) : अज्ञाताने निर्दयीपणे स्त्री जातीचे नवजात अर्भक पूलाखाली टाकून पलायन केल्याची घटना अर्धापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. तालुक्यातील दाभड, भोकरफाटा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पादचारी पूलाखाली आज सकाळी (दि.६) साडेनऊ वाजता नागरिकांना अर्भक आढळून आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभड ( ता.अर्धापूर) येथील भोकरफाटा परिसरात एका पादचारी पूल आहे. या पूलाखाली अज्ञाताने कपड्यात गुंडाळून स्त्री जातीचे जिवंत नवजात अर्भक ठेवले होते. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला.
माहिती मिळताच घटनास्थळी चाईल्ड लाईन, पोलीस, आरोग्य आदी विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर नवजात अर्भकास चाईल्ड लाईनच्या दिपाली सूर्यवंशी यांनी गोविंदसिंगजी रुग्णालय नांदेड येथे दाखल केले. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, चालक राजू पाचंगे, डॉ.विशाल गवळी आदी घटनास्थळी दाखल झाले होते. सदर बालकावर उपचार सुरू असल्याची माहिती नांदेड चाईल्ड लाईनच्या सुपरवायझर ऐश्वर्या शेवाळे, दिपाली सूर्यवंशी यांनी दिली.