महावितरणचा प्रताप! ग्राहकाला चक्क १६५ रुपये प्रति युनिटने दिले २४ हजारांचे ‘महा’बिल!
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: January 31, 2024 07:33 PM2024-01-31T19:33:17+5:302024-01-31T19:34:55+5:30
मीटर रिडींग घेताना युनिटचे आकडे व्यवस्थित घेतले जात नसल्याने अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांना पाठवले जाते.
नांदेड : महावितरण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मीटर रिडींग आणि बिलातील तफावत हा घोळ नित्याचाच सुरू आहे. तरोडा बु. भागातील राधानागरी येथील ज्योती राम डोलारे या यांना प्रतियुनिट १६५ रुपयांप्रमाणे १४४ युनिटला तब्बल २३ हजार ८६० रुपयांचे बिल पाठवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. महावितरणकडून वीज चोरी व वीज गळती रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. परंतु, या मोहिमेला अजूनही यश आलेले नाही. ज्या भागात जास्त वीज गळती असते, तेथील ग्राहकांचा भार नियमित वीजबिल भरणाऱ्या सामान्य ग्राहकांवर लादला जातो. मीटर रिडींग घेताना युनिटचे आकडे व्यवस्थित घेतले जात नसल्याने अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांना पाठवले जाते. त्यामुळे नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो.
तरोडा (बु.) भागातील राधानगरी येथे वास्तव्यास असलेल्या ज्योती डोलारे यांच्या घरात केवळ दोन दिवे आणि एक पंखा एवढीच उपकरणे आहेत. डोलारे यांना नियमित केवळ ५०० ते ६०० रुपयांपर्यंत वीजबिल येते. पण, महावितरणकडून मीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्याने १४४ युनिट घेत प्रतियुनिट १६५ रुपयांप्रमाणे तब्बल २३ हजार ८६० रुपयांचे वीजबिल दिलेले आहे. डोलारे यांना एक महिन्याचे म्हणजे ऑक्टोबरचे बिल इतक्या मोठ्या रकमेचे दिले आहे. हे वाढीव बिल कमी करण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून महावितरण कार्यालयात चकरा मारूनही संबंधितांकडून त्याची दखल घेतलेली नाही. महिना सात ते आठ हजार रुपयांत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या डोलारे यांनी हे वीजबिल कसे भरावे? असा प्रश्न आहे.
चार महिन्यांपासून कार्यालयात चकरा
डोलारे यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल दिले आहे. हे बिल कमी करावे, यासाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्या महावितरणच्या कार्यालयात चकरा सुरू आहेत. परंतु, अद्यापही समाधानकारक बिल कमी केले नसल्याचे डोलारे यांनी सांगितले.
बिल भरायचे कसे?
आमच्याकडे विजेचा वापर अतिशय कमी असून, दर महिन्याला ५०० ते ६०० रुपये इतकेच बिल येते. पण ऑक्टोबर महिन्याचे २३,८६० रुपये बिल दिल्याने खायचे काय आणि बिल भरायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- ज्योती राम डोलारे, वीज ग्राहक