अतिवृष्टीची कंपनीकडून महिनाभराने पाहणी, शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान अन् घेऊन आले १२ नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 07:36 PM2024-10-01T19:36:42+5:302024-10-01T19:37:54+5:30
अतिवृष्टीच्या पाहणीची कंपनीला महिनाभराने जाग; दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती कर्मचाऱ्यांवर केली.
- गोविंद शिंदे
बारूळ (ता. कंधार) : कंधार तालुक्यातील बारूळ, मजरे वरवंट शिवारात १ आणि २ सप्टेंबर असे सलग दोन दिवस अतिवृष्टीमुळे परिसरातील जवळपास दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे मातेरं झाले होते. शासनाच्या निर्देशानुसार ७२ तासांच्या आत १९४७ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी नोंदविल्या; परंतु त्याच्या तब्बल २६ दिवसांनंतर पीक विमा कंपनीला या गावात नुकसानीची पाहणी करण्याची जाग आली. त्यानंतर सोमवारी गावात आलेल्या पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फक्त १२ शेतकऱ्यांच्या नावाची यादी घेऊन आल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.
जिल्ह्यात १ आणि २ सप्टेंबरला अनेक मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. शासनाने नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळवावे, असे बंधन टाकले. त्यानुसार बारूळ परिसरातील १९४७ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन नोंदी केल्या. एक ते दोन दिवसांत पीक विमा कंपनीचे कर्मचारी गावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु तब्बल २६ दिवसांनंतर पीक विमा कंपनीचे कर्मचारी गावात प्रकटले. त्यामुळे महिनाभरानंतर आता शेतातील अतिवृष्टीची काय पाहणी करणार? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत केवळ १२ शेतकऱ्यांच्या नावाची यादी आणली होती. कंपनीकडून या १२ शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांचा पारा चांगलाच चढला.
दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने पीक विमा कर्मचाऱ्यांना सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, पीक विमा कंपनीच्या महिनाभरानंतर उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार म्हणजे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.