शेतातील सालगड्याच्या घरात दरोडा; मारहाणीत पती-पत्नी जखमी
By प्रसाद आर्वीकर | Published: November 21, 2023 06:58 PM2023-11-21T18:58:26+5:302023-11-21T18:59:24+5:30
पती-पत्नीला मारहाणीत महिला गंभीर स्वरूपात जखमी नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू
लोहा : तालुक्यातील लांडगेवाडी येथे शेतात राहणाऱ्या सालगड्याच्या घरात घुसून सालगड्यासह त्याच्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आली. पत्नीच्या अंगावरील सोन्या-चांदीने हिसकावून घेत चोरटे पसार झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लांडगेवाडी हे गाव माळाकोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. पोलिस ठण्यापासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. कंधार तालुक्यातील दुर्गा तांडा येथील महेरबान चव्हाण हे लांडगेवाडी येथील माजी सरपंच सोनबा लांडगे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ लगत हे शेत आहे. महेरबान चव्हाण, त्यांची पत्नी आणि मुले शेतातच राहतात. २० नोव्हेंबर रोजी रात्री महेरबान चव्हाण हे शेतातील कामे आटोपून घरात झोपले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी महेरबान चव्हाण यांच्या पत्र्याच्या घराचा दरवाजा उचकून आत प्रवेश केला.
महेरबान चव्हाण यांच्या पत्नी विमलबाई यांच्या गळ्यातील गंठण ५ ग्रॅम, पायातील वाळे, हातातील पाटल्या, धनकडे जोड, गळ्यातील पोत असे सोन्या- चांदीचे दागिने हिसकावून घेतले. महेरबान चव्हाण व पत्नी विमलबाई यांना जबर मारहाण केली. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय अधिकारी मारोती थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप निलपत्रेवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ, श्वान पथकालाही पाचारण केले होते. दोन्ही पथकांनी कसून चौकशी केली. मात्र, चोरट्यांचा सुगावा लागला नाही. माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
विमलबाईंची प्रकृती चिंताजनक
विमलबाई यांच्या डोक्याला गंभीर मारहाण लागली असून, त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. महेरबान चव्हाण यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी चोरट्यांनी महेरबान चव्हाण यांचा मुलगा गणेश व सून चंद्रकला हे राहत असलेल्या घराला बाहेरून कोंडी लावून घेतली. त्यानंतर आई-वडील राहत असलेल्या घरात चोरी केली.