दुचाकी थांबवून रस्त्यावर बोलत उभ्या तिघांना भरधाव ट्रकने उडवले; एक ठार, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:43 PM2022-06-30T12:43:58+5:302022-06-30T12:44:14+5:30
एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जखमी दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
अर्धापूर (नांदेड) : भरधाव ट्रकने रस्त्यावर उभ्या दुचाकीवरील दोघांना आणि त्यांच्यासोबत बोलत उभ्या एकास जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी (दि.२९ ) रात्री ११ वाजता नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दाभड गावाजवळ घडली. अपघातात गंभीर जखमी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. सखाराम केशवराव राजेगोरे असे मृताचे नाव आहे.
दाभड गावाजवळ अर्धापूर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरील सखाराम केशवराव राजेगोरे (वय १९), सचिन नागोराव घोडे (वय २०) हे दोघे भागवत गणपत घोडे (वय २६) यास रस्त्यावर बोलत होते. या दरम्यान, नांदेड मार्गे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने ( टि.एस. १२ यु.डी. १६८४) रस्त्यावरील तिघांना जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग केंद्र वसमत फाटा येथील प्रभारी अधिकारी शंकर भोसले, सुनील पाचपोळे, अविनाश धुमाळ, वसंत शिंगारे, इर्शाद बेग, राजकुमार व्यवहारे,जमादार बालाजी तोरणे, ईश्वर लांडगे यांनी जखमींना नांदेड येथील खासगी रुग्णालय उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, उपचार सुरु असताना सखाराम राजेगोरे याचा मृत्यू झाला. तर सचिन घोडे आणि भागवत घोडे हे दोघे गंभीर आहेत. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.