नांदेडमध्ये कापड दुकानाला भीषण आग, अग्नीशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल
By प्रसाद आर्वीकर | Updated: September 29, 2022 15:51 IST2022-09-29T15:50:32+5:302022-09-29T15:51:20+5:30
शहरातील वजीराबाद भागातील तिरंगा चौकात खुबसूरत नावाचे मोठे कापड दुकान आहे. या दुकानातून धुराचे लोट बाहेर येत असल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले.

नांदेडमध्ये कापड दुकानाला भीषण आग, अग्नीशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल
नांदेड : शहरातील तिरंगा चौक भागात असलेल्या खुबसुरत कापड दुकानाला मोठी आग लागल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. अग्नीशमन विभागाचे कर्मचारी मागील दोन तासांपासून आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती.
शहरातील वजीराबाद भागातील तिरंगा चौकात खुबसूरत नावाचे मोठे कापड दुकान आहे. या दुकानातून धुराचे लोट बाहेर येत असल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले. ही माहिती महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाला दिल्यानंतर तातडीने अग्नीशमनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग लागलेल्या ठिकाणापर्यंत पोहचता येत नसल्याने दुकानाची भिंत जेसीबीच्या साह्याने पाडून आग विझविण्याचा प्रयत्न केला जात होता. आतापर्यंत अग्नीशमनच्या १० बंबाच्या साह्याने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. अग्नीशमनचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.