शिक्षकदिनी अनोखा सन्मान, वाजतगाजत मिरवणूक काढत शिक्षकांचे ग्रामस्थांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 07:07 PM2022-09-05T19:07:34+5:302022-09-05T19:07:55+5:30
ग्रामस्थांनी केलेल्या या कौतुकाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
मुदखेड (नांदेड): महाराष्ट्रभर शिक्षकांचा मुख्यालयाचा प्रश्न चर्चेत असतांना तालुक्यातील मौजे वाई येथील ग्रामस्थांनी चक्क शिक्षकांच्या कार्याचे आनोखे कौतुक केले आहे. शिक्षक दिनी गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून शिक्षकांचा ग्रामस्थांनी सन्मान केला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या कौतुकाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
मुदखेड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये 'आम्ही चालवू आमची शाळा' हा उपक्रम शिक्षक दिनानिमित्त मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा चालवून एक दिवसांचा शिक्षक म्हणून शालेय कामकाज केले. तर मौजे वाई येथील ग्रामस्थांनी शिक्षकांप्रती त्यांच्या कार्याचा आदर व्यक्त करत त्यांचा सन्मान केला. तालुक्यात सर्वत्र शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या संकल्पनेतून मुदखेड तालुक्यातील वाई येथील जिल्हा परिषद शाळेत दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांचा फेटे घालून, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शिक्षकांची वाजत गाजत मिरवणूक काढत शिक्षकांच्या कार्याप्रती ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी गावातील सर्व पदाधिकारी ग्रा.पं. सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे आजी व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी शिक्षक डी.के. पिन्नलवार, श्यामसुंदर कुरुंदे, नामदेव मुंढे, गोविंद मुंढे आदी शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.