अंत्यविधीसाठी जाताना जीपचे टायर फुटले; अपघातात सासूसह जावई ठार
By प्रसाद आर्वीकर | Published: August 18, 2022 07:50 PM2022-08-18T19:50:03+5:302022-08-18T19:50:30+5:30
महामार्गावर कुष्णूरजवळ जीपचे समोरील टायर फुटल्याने जीप पलटी खाल्ली.
नायगाव/ कृष्णूर (नांदेड) : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात देगलूर तालुक्यातील जावई आणि सासूचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हैदराबाद मार्गावरील कृष्णूरजवळ ही घटना घडली.
नांदेड येथील देगलूर नाका परिसरात एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी देगलूर तालुक्यातील गोनेगाव व देगाव येथील नातेवाईक केए ३२/ एम ६४३२ या क्रमांकाच्या क्रुजर जीपने जात होते. सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान नांदेड- हैदराबाद महामार्गावर कुष्णूरजवळ जीपचे समोरील टायर फुटल्याने जीप पलटी खाल्ली. यात शेख महेबूब बाबू शेख (४०) व अहेमदबी शेख खुदबोद्दिन शेख (५५) या जावई व सासूचा जागीच मृत्यू झाला. पिरसाब नवाबसाब शेख (६५,गोनेगाव), खाजा मगदूम शेख (४५), फरजना खाजा शेख (४०, देगाव), खुदबोद्दीन नवाज साब (६० देगाव), घाशी साब बाबूसाब शेख (५५, चालक, गोनेगाव ), शादुल बाबूसाब शेख (४५, गोनेगाव) , आजमिर महेबूब शेख (४०, गोनेगाव), खाजा साब मौलासाब शेख (४५), हैदर इस्माईल साब शेख (४०, गोनेगाव) हे ८ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
सदरील अपघाताची माहिती समजताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी, पोलीस उप निरिक्षक दिनेश येवले व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर काही जखमींनी मदतीची वाट न बघता मिळेल त्या वाहनाने नांदेड गाठले. काही जखमी शासकीय रुग्णालयात तर काही जण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.