हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल शेतात तसेच, विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने महिलेचा मृत्यू
By श्रीनिवास भोसले | Published: March 20, 2023 02:02 PM2023-03-20T14:02:57+5:302023-03-20T14:03:15+5:30
महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल ५ दिवसानंतरही तसेच
नांदेड : गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे पोल तसेच ट्रांसफार्मर दुरुस्तीसाठी पाच दिवसानंतरही मुहूर्त सापडला नाही. या तुटलेल्या तारांतून विद्युत प्रवाह सुरू असल्याने शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मुदखेड तालुक्यातील बारड येथे घडली आहे.
धुरपातबाई पिराजी रापाणवाड (वय ५५) रा. इंदिरा नगर बारड असे शॉक लागून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला चारा घेण्यासाठी गेली असता अचानकपणे तुटलेल्या तारात विद्युतपुरवठा होऊन महिलेला शॉक बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. सोमवारी अचानक वीज टाकली असता ही घटना घडली. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्ती अथवा पाहणी न करताच वीजपुरवठा सुरू केल्याने हा अपघात घडला आहे. त्यामूळे सदर अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गुरुवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पश्चात विविध समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान अतिवृष्टीत वादळ वाऱ्यामुळे पडलेले पोल रोहित्र दुरुस्त करण्याच्या कामाला दिरंगाई होत आहे.