नांदेडच्या वजिराबाद चौकात भरधाव टँकरने महिलेला चिरडले
By शिवराज बिचेवार | Updated: October 1, 2022 19:54 IST2022-10-01T19:53:41+5:302022-10-01T19:54:20+5:30
पेट्रोल घेवून आलेला हा टँकर श्रीनगर येथील पोलिस पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरवठा करण्यासाठी जात होता.

नांदेडच्या वजिराबाद चौकात भरधाव टँकरने महिलेला चिरडले
नांदेड- शहरातील वर्दळीच्या वजिराबाद चौक परिसरात टँकरने महिलेला वयोवृद्ध महिलेला चिरडले. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर या रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
लोहा तालुक्यातील गोळेगाव येथील संगाबाई विठ्ठल केंद्रे (६५) या काही कामासाठी नांदेडला आल्या होत्या. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पायी त्या वजिराबाद चौकातून जात होत्या. यावेळी वळणावर लातूर येथून आलेल्या टँकरने ( एम.एच.१२, क्यू.जी.५००२ ) संगाबाई यांना चिरडले. टँकरच्या मागील चाकाखाली आल्याने संगाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वजिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून टँकर जप्त करुन ठाण्यात लावला. या प्रकरणात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, पेट्रोल घेवून आलेला हा टँकर श्रीनगर येथील पोलिस पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरवठा करण्यासाठी जात होता. या घटनेनंतर या रस्त्यावरील वाहतुक काही काळ खोळंबली होती.