शेतात झोपलेल्या तरुणाची गळा चिरून हत्या; संशयित आरोपी रातोरात गावातून पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 04:48 PM2024-03-09T16:48:19+5:302024-03-09T16:48:37+5:30
संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळे तीन पथके रवाना झाली आहेत.
उमरी (जिल्हा नांदेड) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आखाड्यावर झोपलेल्या तरुणाचा धारदार शस्त्रांनी गळा चिरून निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी. घटनेनंतर संशयित आरोपींनी गाव सोडून पलायन केले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. उमाकांत गोविंद नंदगाये वय २३ वर्षे रा. कळगाव ता. उमरी असे या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रोजच्याप्रमाणे सकाळी उमाकांत शेतावरून घरी आला नाही. म्हणून त्याचा चुलत भाऊ महेश नंदगाये याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण फोन उचलला नाही. त्यामुळे तो शेतातील आखाड्यावर पोहोचला. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत उमाकांतचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते, पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.
झटका मशीनच्या वादातून जीव गेला
दरम्यान, पिकाच्या संरक्षणासाठी रानडुकराला झटका देण्यासाठीची मशीन चोरल्याच्या संशयावरून उमाकांत याचे दोन दिवसांपूर्वी काही जणांसोबत वाद झाला होता. यावेळी उमाकांतचा चुलत भाऊ महेश नंदगाये यांनी हा वाद सोडविला. त्यानंतर शुक्रवारी उमाकांत हा दररोजच्या प्रमाणे आखाड्यावर झोपायला गेला. वाद झालेल्यांचे शेत शेजारीच असल्याने त्यांना याची माहिती होती. ही संधी साधून त्यांनीच उमाकांत याचा खून केल्याची तक्रार महेश नंदगाये यांनी उमरी पोलिसात केली.
संशयित आरोपी गावातून पसार
या प्रकरणी बालाजी यशवंत धुतुरे ,पुरुषोत्तम बाबू सरोदे, माधव यशवंत धुतुरे, राहुल बाबू सरोदे, माधव कोडोपंत तारू, यशवंत गंगाराम धुतुरे या सहा आरोपींविरुद्ध हत्त्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटना घडल्यापासून संशयित आरोपींनी घराला कुलूप लावून रातोरात गावातून पलायन केले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळे तीन पथके रवाना झाली आहेत. तसेच कळगाव शिवारातील घटनास्थळी पोलिसांचे श्वानपथक तसेच फॉरेन्सिक टीमने भेट देऊन माहिती गोळा केली. सदर हत्या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश माने हे पुढील तपास करीत आहेत.