नांदेडात शाळांच्या दुर्लक्षामुळे ७२ हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ‘इनव्हॅलिड’
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: March 20, 2024 06:28 PM2024-03-20T18:28:00+5:302024-03-20T18:28:41+5:30
३१ मार्चपर्यंत व्हॅलिड न केल्यास शासनाच्या सर्वच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार
नांदेड : राज्याच्या वित्त विभागाने स्पष्ट आदेश दिलेले असताना शाळा प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील ७२ हजार ९७० विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडच केले नसल्याची बाब समोर आली आहे. ३१ मार्चपर्यंत आधार व्हॅलिड न केल्यास १ एप्रिलपासून संबंधित विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्वच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ११ मे २०२२ रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचा डेटाबेस तयार करून तो आधारशी संलग्नीकृत करण्यात यावा तसेच पोषण आहार योजनेंतर्गत महिला व बालविकास, शालेय शिक्षण व क्रीडा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी विकास आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागांनी पोषण आहाराशी संबंधित सर्व लाभार्थ्यांची नावे आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करूनच संबंधित योजनांना निधी वितरित करण्यात यावा, असे या निर्णयात म्हटले होते. जिल्ह्यात युडायसनुसार ६ लाख ३८ हजार ९९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, त्यापैकी ५ लाख ६६ हजार २० विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन झाले आहे, तर ७२ हजार ९७० विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही व्हॅलिड करणे बाकी आहे. युडायसप्रमाणे आधार व्हॅलिडेशनचे प्रमाण ८८.५८ टक्के इतके असून, यापुढे आधार व्हॅलिड विद्यार्थीसंख्येवरच शाळांना अनुदान मिळणार आहे.
सरल पोर्टलवर ९४ टक्के आधार व्हॅलीडेशन
सरल पोर्टलवर एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ६ लाख २३ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी आधार व्हॅलिड केले असून, ३९ हजार ७३३ विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करणे बाकी आहे. सरल पोर्टलवर याचे प्रमाण ९४.०१ टक्के इतके आहे, तर सरल आणि युडायसप्रमाणे ६७ हजार २३९ विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड झालेच नाहीत.
१ एप्रिलपासून लाभ होणार बंद
शासनाच्या विविध विभागातील वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभधारक, लाभार्थ्यांचे आधार कार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही शंभर टक्के ३१ मार्च २०२४ पर्यंत करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. ही कार्यवाही शंभर टक्के करण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या सचिवांवर राहणार असून, शंभर टक्के कार्यवाहीनंतर हमीपत्र सादर करावे लागणार आहे. आधार कार्ड व्हॅलिडची कार्यवाही शंभर टक्के न झाल्यास संबंधित योजनांचा निधी १ एप्रिल २०२४ पासून वितरित करण्यात येणार नसल्याचे या निर्णयात म्हटले आहे.
व्हॅलिड कसे समजायचे नाव
जन्मतारखेत चूक किंवा नावातील स्पेलिंगमध्ये चूक असली तर ते आधार कार्ड इनव्हॅलिड ठरते. त्यामुळे आवश्यक कार्यवाही शाळांना करावी लागेल. आधारवरील स्पष्ट नोंद शाळांनी यू-डायसमधील माहितीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय आधार व्हॅलिड समजले जात नाही.
युडायस व्हॅलिड नसलेले तालुकानिहाय आधार कार्ड
नांदेड ग्रामीण ९४१६, मुखेड ८२९९, नांदेड शहर २२,८६९, भोकर ४१८९, हिमायतनगर ३१३८, मुदखेड ३८१६, लोहा ५०४०, हदगाव ३८२०, कंधार २०७९, उमरी ८०३, किनवट २७०३, धर्माबाद १०१५, नायगाव २३४४, अर्धापूर ६७८, देगलूर १३९१, बिलोली ८६३, माहुर ५०७ असे तालुकानिहाय आधार कार्ड अद्यापही व्हॅलिड नाहीत.
अन्यथा शाळांना अनुदान नाही
शाळांना गणवेश, शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके तसेच सर्व प्रकारचे अनुदान मिळण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन करावे, अन्यथा कुठल्याच प्रकारचे अनुदान मिळणार नाही.
-सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)