आधार क्रमांक एकाचा, तर पासबुक दुसऱ्याचे! नांदेडमध्ये लाडक्या बहिणींच्या पैशाचा घोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 07:06 PM2024-10-01T19:06:17+5:302024-10-01T19:06:48+5:30
सीएससी केंद्र चालकांनी ओळखीच्या लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची कागदपत्रे वापरून शंभरहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे हडप केले.
हदगाव (जि. नांदेड) : आधार कार्डावर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केल्याप्रकरणी प्रशासन अजूनही गंभीर नसल्याचे दुसऱ्या दिवशी आढळून आले. मनाठा येथील सीएससी केंद्र चालक सचिन भुजंग थोरात व सुनील भुजंग थोरात या दोन बंधूंनी ओळखीच्या लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची कागदपत्रे वापरून शंभरहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे हडप केले. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.
मनाठा येथील नंदणी चंदण चव्हाण या युवतीची कागदपत्रे वापरली व अलीम कादरी यांचे आधार व बँक पासबुक वापरले. त्यामुळे दोघांच्याही खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झाले. सचिन थोरात व सुनील थोरात या दोघांनी गावातील ओळखीच्या युवकांना गोड बोलून रोजगार हमी विहिरीचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार, असे सांगून आधार कार्ड व बँक पासबुक जमा केले. गावातील ४६ लोकांनी त्यांच्याकडे कागदपत्रे जमा केली. लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता शासनाने २८ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला. सचिन थोरात याने युवकांची कागदपत्रे घेतली. त्या युवकांना दोनशे रुपये खर्च म्हणून दिले.
तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी केली चौकशी
‘लोकमत’ने आज लाडकी बहीण योजनेतील घोळ उघड केल्यानंतर सोमवारी भल्या पहाटे तलाठी व मंडळ अधिकारी गावात आले. त्यांनी १६ लोकांचे जबाब घेतले. विहिरीचे पैसे येणार आहेत, असे सांगून कागदपत्रे घेतल्याचे सर्व नागरिकांनी जबाबात सांगितले. दरम्यान, तहसीलदारांनी गावाला भेट दिली नाही. सध्या तरी गुन्हा दाखल झालेला नाही. या घोटाळ्यामुळे आजूबाजूच्या गावांतील महिलाही सतर्क झाल्या आहेत.