आरक्षण हक्क कृती समितीचा २६ रोजी आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:33+5:302021-06-23T04:13:33+5:30
नांदेड - अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समूहाचे पदोन्नतीमधील आरक्षण संपवून ३३ टक्के ...
नांदेड - अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समूहाचे पदोन्नतीमधील आरक्षण संपवून ३३ टक्के आरक्षण संपविण्याचे कटकारस्थान करणार्या शासनाविरुध्द निषेध नोंदविण्यासाठी आणि हे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी येत्या २६ जूनरोजी राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यातील विविध १२० कर्मचारी, अधिकारी, संघटना सहभागी होणार असल्याची माहिती राज्य कोअर कमिटी सदस्य आरक्षण हक्क समिती महाराष्ट्र राज्यचे निमंत्रक इंजि. संजीवन गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध जात समूहासाठी लागू केलेले आरक्षण रद्द करून विविध जात समूहातील मागासवर्गीयांना पुन्हा गुलामीच्या जोखडात गोवण्याचा डाव सरकारने घातला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय नोकरीतील पदोन्नत्यांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने योग्य भूमिका न बजाविल्याने हे आरक्षण रद्द झाले; तर ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आणण्यात आले आहे. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी आणि आरक्षण रद्द करण्यास कारणीभूत असलेल्यांवर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल करावेत, आरक्षण मंत्रीगट समितीचा अध्यक्ष मागासवर्गीय असावा, नवीन कामगार कायदा रद्द करावा, परदेश शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा वाढवावी, खासगी विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि फ्री शिप लागू करावी, सरकारी कंपन्या, बँका, विविध विभागांचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण बंद करावे, तेथे आरक्षण लागू करावे, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील १२० हून अधिक सामाजिक संघटना एकत्रित येऊन २६ जूनरोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढणार आहे. बानाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इंजि. संजीवन गायकवाड, बामसेफचे मिलिंद भिंगारे, ईंसाफचे इंजि. आर. एस. टोपे, बानाईचे इंजि. भरतकुमार कानिंदे, महावितरण संघटनेचे इंजि. सिध्दार्थ पाटील, कास्ट्राईबचे गणेश कांबळे, इंजि. अभिजित बळेगावकर, हत्तीअंबिरे, गोणारकर आदींची उपस्थिती होती. मोर्चास शासनाकडून परवानगी मिळो अथवा न मिळो, मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती इंजि. गायकवाड यांनी यावेळी दिली.