आवर्तनाच्या श्रेयासाठी नांदेड जिल्ह्यातील आजीमाजी आमदारांमध्ये चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:03 AM2017-12-10T01:03:54+5:302017-12-10T01:04:07+5:30
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून रबी हंगामासाठी आवर्तन सोडण्याच्या विषयावरुन राष्ट्रवादी आणि सेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे़ माजी आ़शंकर धोंडगे यांनी आंदोलन करुन आपल्यामुळेच पाणीपाळ्या सुटणार असल्याचा दावा केला तर आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी धोंडगे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून रबी हंगामासाठी आवर्तन सोडण्याच्या विषयावरुन राष्ट्रवादी आणि सेना नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे़ माजी आ़शंकर धोंडगे यांनी आंदोलन करुन आपल्यामुळेच पाणीपाळ्या सुटणार असल्याचा दावा केला तर आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी धोंडगे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका केली़
विष्णूपुरी प्रकल्पातून रबी हंगामासाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे माजी आ़शंकर धोंडगे यांनी पाटबंधारे विभागात ठिय्या आंदोलन केले होते़ त्यावेळी त्यांनी सेनेचे आ़प्रताप पाटील चिखलीकर आणि आ़ हेमंत पाटील यांच्यावर टीका केली होती़ त्यावेळी चिखलीकर यांनीही पाटबंधारे विभागासोबत या विषयावर बैठक झाली असून लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे़ धोंडगे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीका केली होती़ त्यानंतर गेले काही दिवस हा विषय थंडबस्त्यात होता़ त्यात चार दिवसांपूर्वी आ़हेमंत पाटील यांनी विष्णूपुरीसाठी तीन आवर्तने मंजूर झाल्याची माहिती दिली़ त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शेतकºयांसह पाटबंधारे विभागात आंदोलन केले़ पाटबंधारेने विष्णूपुरीवरील रोहित्राचे काम पूर्ण होताच पाणीपाळ्या सोडण्याचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिले़ त्यामुळे धोंडगे यांनी आंदोलनामुळेच पाणी पाळ्या सोडण्यात येणार असल्याचा दावा केला़
त्यानंतर शनिवारी आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनीही धोंडगेंवर टीका केली़ ते म्हणाले, यावर्षी विष्णूपुरी प्रकल्प आणि पैठणचे जायकवाडी धरण हे दोन्ही १०० टक्के भरले आहेत. या प्रकल्पामधून शेतीला पाणी मिळण्याचा शेतकºयांचा हक्क असताना प्रशासनाकडून पाणी सोडण्याबाबत अनास्था दाखविली गेली मात्र या अनास्थेविरुद्ध आपण शासनाकडे वारंवार नाराजी व्यक्त केली. विष्णूपुरी कालवा समितीची पहिली बैठक १७ नोव्हेंबर रोजी झाली.
या बैठकीतही शेतकºयांची भूमिका स्पष्टपणे मांडली होती. प्रशासनाने शेतीसाठी पाणी सोडण्यात अडचणी असल्याचे सांगितले. २० नोव्हेंबरच्या बैठकीत जायकवाडीचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी पाणी सोडण्यास संमती दिली. त्याच बैठकीत विष्णूपुरी प्रकल्पातून शेतकºयांसाठी तीन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही बाब समजताच शंकर धोंडगे यांनी धरणे आंदोलनाची घोषणा केली. वास्तविक शेतकºयांना पाणी मिळावे यासाठी आपण व आ. हेमंत पाटील सातत्याने प्रयत्नशील होतो. त्यामुळेच पाणी सोडले जात असल्याची जाणीव शेतकºयांना आहे. आयत्या बिळावर नागोबा होवून श्रेय लाटण्याची शंकर धोंडगे यांची वृत्ती शेतकरी जाणून आहे. त्यांचे धरणे ना प्रशासन गंभीरपणे घेते ना शासन त्याकडे लक्ष देते अशी त्यांची स्थिती झाली आहे, असा टोलाही आ. चिखलीकरांनी लगावला. प्रकल्पामधून शेतीसाठी पाणी सोडले पाहिजे, ही आपली ठाम भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विष्णूपुरीच्या पाण्यावरुन सुरु असलेले हल्ले आणखी वाढण्याची शक्यता आहे़
सर्वच गोष्टींसाठी पाठपुरावा केला-आ़पाटील
विष्णूपुरी प्रकल्प हा माझ्या मतदारसंघातील आहे़ नांदेड शहराची तहान भागविण्याबरोबरच या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येवून शेतीला फायदा होतो़ ३५ वर्षांपासून जुने असलेले ट्रान्सफार्मर आणि थकित वीजबिलामुळे पाणी उपसा करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या़ त्यामुळे वीजबिल थकबाकीसह तांत्रिक अडचणीसाठी स्वत: फाईल घेवून पाठपुरावा सुरू केला़ वीजबिलाच्या थकित २६ कोटी रूपयांसाठी मंत्रालयात बैठक लावली़ कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून आणि उर्वरित रक्कमेसाठी ऊर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा करून विष्णूपुरीवरील २४ कोटींची थकबाकी दूर केली़ उर्वरित २ कोटी ५८ लाख रूपयांसाठी पाठपुरावा सुरू आहे़ तसेच नवीन ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी रूपये मंजूर केले असून येत्या तीन महिन्यांत नवीन ट्रान्सफार्मर येतील़ तर तात्पुरत्या स्वरूपात कोकणातून ट्रान्सफार्मर मागविले आहेत़ ते आठ दिवसांत बसवून पाणी उपसा केला जाईल़ गोदावरी पाटबंधारे महामंडळाने ट्रान्सफार्मरचे भाडे भरले नसल्याने हा विलंब झाला़ दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे लागणाºया विलंबामुळे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न न करता प्रत्येकाची भावना पाणी मिळणे ही आहे़ ती कशी पूर्ण करता येईल, यासाठी प्रत्यक्ष पाठपुरावा महत्त्वाचा आहे, असे मत आ़ हेमंत पाटील यांनी व्यक्त केले़