बंदूक सोडून हाती पेन घेतला, परिवर्तन झाल्याचे वाटत असतानाच आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न
By शिवराज बिचेवार | Published: May 31, 2023 06:21 PM2023-05-31T18:21:25+5:302023-05-31T18:24:58+5:30
परीक्षेसाठी केंद्रावर आणलेले असताना आरोपीची पोलिसांसोबत झटापट
नांदेड : मोक्का सारख्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आरोपीला शिक्षणाची गोडी निर्माण झाली. त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात त्याला यशवंत महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आणण्यात येत होते. त्यामुळे बंदूक सोडून हातात पेन घेतलेल्या आरोपी सुधारणार, असा विश्वास निर्माण झाला होता. परंतु झाले उलटेच. बुधवारी पेपर सुटताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करीत पोलिसांशीच झटापट केली. यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी लगेच त्याच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.
लक्ष्मण ऊर्फ लक्की मोरे असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर लुटमारी, धमकाविणे, शस्त्र बाळगणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अनेक गुन्ह्यात तो २०२१ पासून तुरुंगात होता. त्याच दरम्यान त्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्याला पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली होती. बंदूक सोडून आता पुस्तके घेतल्याने त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला होता. मोरे याच्या शिक्षणासाठी न्यायालयाकडून परवानगी घेण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी यशवंत महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर प्रथम वर्षाच्या पेपरसाठी त्याला पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले होते.
मंगळवारी हिंदीचा पेपर दिल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा त्याला परीक्षा केंद्रावर आणण्यात आले. जवळपास तीन तास पेपर सोडविल्यानंतर बाहेर पडत असताना मोरे याने पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांसोबत झटापटही केली. त्यामुळे थोडा वेळ परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला होता. पोलिसांनी लगेच मोरे याला पकडून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणात त्याच्या विरोधात आता आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पळून जाण्यासाठीच परीक्षेचे नाटक
आरोपी लक्की मोरे हा अट्टल गुन्हेगार आहे. परंतु त्याने शिक्षणाची इच्छा व्यक्त केल्याने त्याला सर्व साेयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. चोख पोलिस बंदोबस्तात त्याला परीक्षा केंद्रावरही आणण्यात आले होते. परंतु परीक्षेच्या बहाण्याने बाहेर आल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणे त्याच्या चांगलेच अंगलट आहे.