बेंटेक्सला सोनं समजून अपहरणाची योजना आखली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:10 AM2020-08-09T02:10:06+5:302020-08-09T02:10:44+5:30

नांदेड शहरातील घटना; मुख्य आरोपी विकास हटकर अट्टल गुन्हेगार

abduction planned for Bentex assuming it as a gold | बेंटेक्सला सोनं समजून अपहरणाची योजना आखली अन्...

बेंटेक्सला सोनं समजून अपहरणाची योजना आखली अन्...

Next

- शिवराज बिचेवार 

नांदेड : अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी विकास हटकर हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर पोलीस दप्तरी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे़ दरोड्याच्या प्रकरणात तुरुंगात असताना त्याला शुभम गिरीच्या आईकडे दोन किलो सोने असल्याचे इतर साथीदारांकडून समजले़ त्याच क्षणी त्याने शुभमच्या अपहरणाची योजना आखली. मात्र, शुभमच्या आईने पोलीस ठाणे गाठल्याने विकास हटकरच्या योजनेवर पाणी फेरले़ त्याला पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागली़ विशेष म्हणजे, शुभमची आई जमुनाबाईकडे सोने नव्हे, तर त्या बेंटेक्सचे दागिने विकून उदरनिर्वाह चालवितात.

विकास हटकर याने तीन महिन्यांपूर्वीच एका जोडप्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणात तो तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता़ तुरुंगात असतानाच त्याला इतर साथीदाराकडून लोहा येथील जमुनाबाई गिरी यांच्याकडे दोन किलो सोने असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार, ५ आॅगस्ट रोजी हटकरसह पाच जण लोहा येथे टाटा सफारी घेऊन पोहोचले़ रस्त्यावर उभ्या असलेल्या जमुनाबाई यांचा मुलगा शुभम गिरी (वय १६) याला आम्ही पोलीस असून तुझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असे म्हणत गाडीत कोंबले़ यावेळी त्याचा मावसभाऊ विजय गिरी यालाही गाडीत टाकले़ त्यानंतर दोन दिवस ते शुभमला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन फिरत होते़ जबर मारहाणीमुळे शुभम हा बेशुद्धच होता़ शुद्धीवर आल्यानंतर त्याला पुन्हा मारहाण करण्यात येत होती़ खंजीरने त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी टोचण्यात आले होते़ या दोन दिवसांत एकवेळेस खिचडी अन् दुसऱ्या वेळेस भजे त्याला खायला दिले़ निळा येथील आखाड्यावरही त्याला मारहाण करण्यात आली़

मोबाईल लोकशेनवरुन पोलीस निळा येथील हटकर थांबलेल्या आखाड्यावर पोहोचले़ पोलिसांना पाहताच शुभम आणि त्याच्या मावसभावाला घेऊन उसाच्या शेतात आरोपी पळत होते़ पोलिसांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान, हटकर याने पोलिसांच्या दिशेने बंदूक रोखली़ त्याचवेळी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता हटकरच्या पायावर गोळी झाडली व हटकरसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत़ इतर दोघे पसार झाले़

सैन्यातील पळपुटा बनला अट्टल गुन्हेगार
भारतीय सैन्य दलात अवघे काही महिने कर्तव्य बजावल्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये पळून आलेल्या विकास हटकर याने नांदेडातील गुन्हेगारी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता़ सुपारी घेऊन खून करणे, दरोडे यासारख्या गुन्ह्यांत त्याचा हातखंडा होता़ शुक्रवारी सायंकाळी दोन भावांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला़ पोलिसांनी जिवाची बाजी लावत दोन्ही भावंडांची त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली़

मागणी २० लाखांची...
आरोपी हटकर याने जमुनाबाई यांना सुरुवातीला शुभमला जिवंत सोडण्यासाठी २० लाखांची खंडणी मागितली होती़; परंतु त्यानंतर सहा वेळा संपर्क करुन खंडणीची रक्कम कमी करीत नेली़ अखेर पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी त्याने दर्शविली.

Web Title: abduction planned for Bentex assuming it as a gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं