अभिजीत राऊत नांदेडचे नवे जिल्हाधिकारी, तर मनपा आयुक्तपदी भागवतराव पाटील
By प्रसाद आर्वीकर | Published: September 30, 2022 02:09 PM2022-09-30T14:09:20+5:302022-09-30T14:09:41+5:30
जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची १८ ऑगस्ट रोजी नागपूर येथे बदली झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी पद रिक्त होते.
नांदेड : येथील जिल्हाधिकारीपदी अभिजीत राऊत यांची तर महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ.भागवतराव पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश २९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत. तब्बल दीड महिन्यानंतर पूर्णवेळ जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची १८ ऑगस्ट रोजी नागपूर येथे बदली झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी पद रिक्त होते. नवीन जिल्हाधिकारी कोण? याची उत्सूकता होती. दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्हाधिकारीपदी जळगाव येथील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची नियुक्ती झाली आहे. अभिजीत राऊत हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा प्रशिक्षण कालावधी नंदुरबार येथे पूर्ण झाला.
तसेच रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी डॉ.भागवतराव नामदेव पाटील यांची नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.भागवतराव पाटील हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
पालकमंत्री अन् जिल्हाधिकारीही जळगावचेच
नांदेड जिल्ह्यासाठी दोन आठवड्यापूर्वीच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. महाजन हे जळगावचे असून त्यांच्या पाठोपाठ जळगाव येथीलच जिल्हाधिकाऱ्यांची नांदेडला नियुक्त झाले आहेत. त्यामुळे नव्या पालकमंत्र्यांनी जळगाव येथूनच जिल्हाधिकारी आणल्याची चर्चा होत आहे.