मग्रारोहयोची कामे नसल्याने मजूर परप्रांतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:28+5:302021-01-17T04:16:28+5:30
किनवट या आदिवासी तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी- तांडे असून या गाव व वाडी- तांड्याचा कारभार १३४ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ...
किनवट या आदिवासी तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी- तांडे असून या गाव व वाडी- तांड्याचा कारभार १३४ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बघितला जातो. मात्र, मग्रारोहयोच्या कामावर मजुरांची वानवा असल्याने मजुरांचा फुगलेला आकडा पाहता कामे उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीची व यंत्रणेची उदासीनता की मजुरांची या योजनेच्या कामाकडे पाठ, हे समजायला मार्ग नाही. यंत्रणेची केवळ २१ कामे सुरू असून त्यात केवळ पाच कामे रोपवाटिकेची आहेत. ग्रामपंचायतीच्या कामात घरकुल, सार्वजनिक विहीर, सिंचन विहीर, अनगड दगडी बांध ही व इतर कामे सुरू आहेत.
१३४ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत ही कामे सुरू असून १०० ग्रामपंचायतींत अजून एकही काम सुरू नसल्याची माहिती आहे. सध्या बोथ, फुलेनगर, टेम्भी, जरूर, उनकदेव, उमरी (बा.), शिवणी, लोणी, थारा यासह ३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत कामे सुरू आहेत. हाताला कामे नसल्याने बरेच मजूर सीमावर्ती तेलंगणाच्या आदिलाबाद व इतर गावांत काम करण्यासाठी स्थलांतरित झालेले आहेत. ३४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत जी कामे सुरू आहेत त्या कामावर जेमतेम मजूर आहेत.
याबाबत बीडीओ सुभाष धनवे यांना विचारले असता सध्या कामांची मागणी नाही. मार्चपासून तर कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होतील, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.