लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: March 22, 2023 06:25 PM2023-03-22T18:25:43+5:302023-03-22T18:26:43+5:30
या मुलीचे नवऱ्याशी पटत नसल्यामुळे आई-वडिलांनी तिला माहेरी आणले.
लोहा (जि. नांदेड) : येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत या मुलीच्या फिर्यादीनुसार वृत्त असे की, शहरातील श्यामनगरातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह २२ एप्रिल २०२१ रोजी कंधार तालुक्यातील जांभूळवाडी येथील आनंदा नागोराव मुसळे यांच्याशी झाला. सहा महिने संसार चालला. त्यानंतर गावातीलच रोहिदास परमेश्वर मुसळे याच्याशी प्रेमात झाले. दरम्यान या मुलीचे नवऱ्याशी पटत नसल्यामुळे आई-वडिलांनी तिला माहेरी आणले.
वडील बाहेरगावी कामासाठी गेले व आई शेतात कामासाठी जात होती. यादरम्यान रोहिदास मुसळे हा तिला भेटण्यासाठी यायचा. अनेक दिवसांच्या भेटीगाठीनंतर ३ डिसेंबर २०२२ रोजी रत्नेश्वरी मंदिरात तिला लग्न करण्याचे वचन दिले. त्यानंतर रोहिदासने नांदेड- लातूर रस्त्यावरील एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले.
यानंतर १७ फेब्रुवारी २०२३ रोजी रोहिदास मुसळे याने फोन करून आपण दोघे सोबत राहू, असे सांगून कल्याण स्टेशनला बोलवले. यानुसार ही मुलगी १९ फेब्रुवारी २०२३ रोजी घरी कोणालाही न सांगता नांदेड येथून तपोवन एक्स्प्रेसने सकाळी दहा वाजता कल्याण स्टेशनवर पोहोचली. रोहिदास तेथे तिला घेण्यासाठी आला होता. त्यानंतर माझ्याकडे असणारे लग्नातील दागिने व घरातून नेलेले एक लाख रुपये त्याच्याजवळ ठेवले. दरम्यान, रोहिदासच्या मित्राने तरुणाच्या काकाला हे दोघे कल्याण येथे आले असल्याचे सांगितले. त्यानंतर काकाच्या सांगण्यावरून सोहम व्यंकटी मुंडे, रा. पाताळगंगा, ता. कंधार यांनी नांदेड येथे या मुलीला आणून सोडले.
त्यानंतर मुलीच्या कुटुंबातील काही लोकांनी लोहा पोलिस ठाण्यात हजर केले असताना १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करतो, असे रोहिदासने सांगितले होते. मात्र, काही दिवसांनी रोहिदास मुसळे यांनी लग्नास नकार दिल्यामुळे २१ मार्च २०२३ रोजी लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रेखा काळे पुढील तपास करीत आहेत.