थकीत वेतन देण्यासाठी लाच मागणारा प्रभारी कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 06:47 PM2021-04-21T18:47:26+5:302021-04-21T18:49:27+5:30
यावेळी लाचेची उर्वरीत १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना गुंडरे यास रंगेहात पकडण्यात आले.
नांदेड : २०२० वर्षातील थकीत २५ टक्के वेतन अदा करणे तसेच सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्त्याचे देयक व महागाई भत्ता थकबाकीचे देयक काढण्यासाठी २५ हजार रुपयांची रक्कम ठरवून लाचेचा पहिला १० हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतर उर्वरीत १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गणेशराव गुंडरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून थकीत वेतन तसेच महागाई भत्ता व इतर रक्कम देण्यासाठी प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गुंडरे (५३) यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार केली होती. मंगळवारी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये गुंडरे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यावरुन शहाजीनगर येथील जिल्हा परिषद कॉलनीत सापळा रचण्यात आला.
यावेळी लाचेची उर्वरीत १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना गुंडरे यास रंगेहात पकडण्यात आले. शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी, संतोष शेटे, एकनाथ गंगातीर्थ, दर्शन यादव, नरेंद्र बोडके आदींनी ही कारवाई केली.