‘आशा सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:42+5:302021-06-17T04:13:42+5:30
भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा तथा जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे - चिखलीकर यांनी सांगितले, आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा ...
भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा तथा जि.प. सदस्या प्रणिताताई देवरे - चिखलीकर यांनी सांगितले, आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण पाठिंबा आहे. कोरोना काळात आशा सेविकांनी दीड वर्षे काम केले आहे. अजूनही करत आहेत. आरोग्य सुरक्षा नसताना, विमा कवच नसताना, योग्य मानधन मिळत नसतानाही आशा सेविका काम करीत आहेत. मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज, सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. अनेक आशा सेविकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे कोरोनामुळे मृत्यू झाले. नियमानुसार ४ तास काम करणे अपेक्षित असताना १२ तास काम करावे लागते आहे, मात्र या कामाची दखल राज्य सरकारने घेतली नाही.
कोरोना रुग्णांच्या सर्वेक्षणाबरोबर लसीकरण मोहिमेतही राज्य सरकारने आशा सेविकांचा समावेश केला; मात्र अजून या कामाचा पुरेसा मोबदला दिलेला नाही. राज्य सरकारने आशा सेविकांच्या मागण्यांची पूर्तता करावी, राज्य सरकारने गेल्या वर्षीपासूनच प्रोत्साहन भत्ता प्रतिदिन ५०० रु. प्रमाणे द्यावा, या प्रमुख मागण्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांशी चर्चाही झाली; मात्र राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीकाही भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रणिता देवरे- चिखलीकर यांनी केली आहे.