तरुण फळविक्रेत्यांवर काळाचा घाला; तेलंगणातील अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 04:16 PM2019-11-13T16:16:46+5:302019-11-13T16:17:30+5:30

तेलंगणात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून आॅटोचालक  गंभीर जखमी आहे.

accidental death of young fruit vendors from Deglur; Three killed in Telangana accident | तरुण फळविक्रेत्यांवर काळाचा घाला; तेलंगणातील अपघातात तिघांचा मृत्यू

तरुण फळविक्रेत्यांवर काळाचा घाला; तेलंगणातील अपघातात तिघांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देचौघेही तरुण भागीदारीत सफरचंद विक्रीचा व्यवसाय करीत होते.

देगलूर (जि. नांदेड) :  तेलंगणातील नारायणखेड येथील बाजारपेठेत सफरचंद विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आॅटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव  ट्रकने धडक दिली. या अपघातात देगलूर येथील शेख सद्दाम शेख मौलाना  (२८, लाईनगल्ली), शेख सैलानी बाबा शेख महेबूब (२५, भायेगाव रोड), शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन (३०, जियाकॉलनी ) या तीन तरुणांचा मृत्यू झाला. तर एका जणाची प्रकृती गंभीर आहे. ही  घटना मंगळवारी कंदरपल्ली चौरस्त्यावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. 

मंगळवारी नारायणखेड येथे आठवडी बाजार असल्याने शेख सद्दाम शेख मौलाना, शेख सैलानी बाबा शेख महेबूब, शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन व आॅटोचालक शेख हबीबवल्ली चाऊस (२८, तेलीगल्ली ) हे देगलूर येथील चारजण आॅटोने (टीएस १६-युसी ११३०) नारायणखेडकडे जात होते. कंदरपल्ली चौरस्त्यावर समोरुन येणाऱ्या ट्रकने (एमएच ३० एबी- ३५८९) दिलेल्या जोरदार धडकेत शेख सदाम शेख मौलाना हा तरुण जागेवरच ठार झाला. गंभीर दोन जखमींना बांसवाडा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी निजामाबादला नेण्यात येत असताना रस्त्यातच सैलानी बाबा शेख महेबूब याचा मृत्यू झाला. तर  शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन नांदेड येथे उपचारासाठी नेताना नरसीजवळ त्याची प्राणज्योत मालवली. 

आॅटोचालक शेख हबीब वली चाऊस याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्यावर निजामाबादच्या शासकीय रुग्णालयात  उपचार सुरू आहे. दरम्यान, अपघाताची घटना घडताच नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव  घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी इतरत्र हलविण्यास मदत केली. याप्रकरणी बिचकुंदा पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुुन्हा नोंद करण्यात आला आहे.

देगलूर शहरावर शोककळा
तेलंगणात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून आॅटोचालक  गंभीर जखमी आहे. हे चौघेही देगलूर येथील तरुण भागीदारीत सफरचंद विक्रीचा व्यवसाय करीत होते. चारही तरुण अविवाहित असून दररोज कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांसह देगलूर शहरावर शोककळा पसरली आहे. 

Web Title: accidental death of young fruit vendors from Deglur; Three killed in Telangana accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.