तुटलेल्या दुभाजकामुळे अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:15 AM2021-01-04T04:15:54+5:302021-01-04T04:15:54+5:30
ढगाळ वातावरण नांदेड : दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. ढगाळ वातावरणाने ...
ढगाळ वातावरण
नांदेड : दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची शंका वाढली असून, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विविध औषधांची फवारणी केली जात आहे.
मोहीम थंडावली
नांदेड : शहरातील बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने सुरू करण्यात आलेली मोहीम थंडावल्याचे चित्र दिसत आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजीनगर, वजिराबाद, कलामंदिर, वर्कशाॅप, जुनामोंढा या भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
भारत माता चौकात बसविले सिग्नल
नांदेड : चैतन्यनगर येथील भारत माता चाौकात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन याठिकाणी सिग्नल बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत महापालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सदर चौकात नव्याने सिग्नल बसविण्यात आले आहेत. सदर सिग्नल नियमित कार्यान्वित ठेवावेत, तसेच या चौकात नियमितपणे दोन वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी होत आहे.
मास्कचा पडला विसर
नांदेड : शासनाच्या वतीने विविध नियमावली जाहीर करून बाजारपेठ खुली करण्यात आली आहे; परंतु मास्क वापराकडे नागरिकांसह दुकानदारांकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुकानात विनामास्क येण्यास परवानगी देऊ नये, असा आदेश असताना बहुतांश दुकानदारच मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे.
हौशी मंडळींचा हिरमोड
नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा कोरोनामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हाैशी मंडळींचा चांगलाच हिरमोड झाला आहे. माळेगाव यात्रा म्हणजे ग्रामीण भागातील जनतेसाठी एक पर्वणीच असते. यातून होणारी लाखो रुपयांची उलाढालही ठप्प होणार आहे.