ट्रॅव्हल्सचा सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले आरोपीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:00 AM2018-12-13T01:00:34+5:302018-12-13T01:01:48+5:30
अनेकांना लाखोंनी गंडविणारा आरोपी ट्रॅव्हल्सने पुण्याला पलायन करण्याच्या तयारीत असताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या तत्परतेमुळे लातूर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला जेरबंद केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
बा-हाळी : येथे बोगस क्रेडीट सोसायटीची शाखा उघडून अनेकांना लाखोंनी गंडविणारा आरोपी ट्रॅव्हल्सने पुण्याला पलायन करण्याच्या तयारीत असताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या तत्परतेमुळे लातूर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला जेरबंद केले़ १२ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली़ गेल्या चार महिन्यांपासून हा आरोपी फरार होता़
बा-हाळीत १६ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र अर्बन को-सोसायटीच्या नावाने शाखा सुरु करण्यात आली होती़ बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून १७ तरुणांकडून लाखो रुपये घेवून के्रडीट सोसायटीत त्यांना कामाला लावले होते़ स्थानिक तरुण सोसायटीत असल्यामुळे अल्पावधीत परिसरातील नागरीकांचा या सोसायटीवर विश्वास बसला़ त्यानंतर व्यापारी, नोकरदार, शेतकरी, शेतमजूर यांनी मोठ्या प्रमाणात सोसायटीत रक्कम जमा केली़ परंतु पाच महिन्यातच सोसायटीने गाशा गुंडाळला़
९ आॅगस्ट रोजी स्वयंघोषित बँक संचालक सुनिल दिंडे, विभागीय व्यवस्थापक संदीप वाघमारे, मुबारक भोंडे, लक्ष्मण गायकवाड, बाºहाळी शाखा व्यवस्थापक विजय राठोड या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यानंतर ११ आॅगस्ट रोजी सोसायटीच्या शाखेला सील ठोकण्यात आले होते़ परंतु गेल्या पाच महिन्यांपासून हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़
आरोपी सापडत नसल्यामुळे तरुणही अस्वस्थ झाले होते़ त्यांनी स्वताहाच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती़ बा-हाळीचा शाखा व्यवस्थापक विजय राठोड हा डोंगरगाव ता़जळकोट येथील रहिवाशी असून गेल्या काही दिवसांपासून तो पुण्यात होता़ १२ डिसेंबरला साकाळे ता़शिरुर अनंतपाळ येथील सासरवाडीतून पत्नीला पुण्याला घेवून जात असल्याची माहिती तरुणांना मिळाली होती़
त्या तरुणांनी गाडीचा क्रमांक, सीट क्रमांकासह माहिती मुक्रमाबाद पोलिसांना दिली होती़ परंतु मुक्रमाबाद पोलिसांनी वाहन नसल्याचे सांगत असमर्थता दर्शविली़ त्यामुळे हतबल झालेल्या तरुणांनी गुगलवरुन अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांना फोन क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधाला़ अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिंदे यांची तातडीने दखल घेत मुक्रमाबाद आणि लातूर पोलिसांशी संपर्क साधला़ आरोपी हा साकोळ येथून रात्री आठ वाजता पुण्याच्या ट्रॅव्हल्समध्ये बसताच त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करीत त्याला जेरबंद केले़ माहिती मिळाल्यानंतर फक्त दीड तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या़