चिमुरडीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला आजन्म जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 07:23 PM2020-01-14T19:23:18+5:302020-01-14T19:25:10+5:30
आरोपीवर बलात्काराचे दोन गुन्हे
नांदेड : हिमायतनगर शहरातील फुलेनगर भागात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात भोकर न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १६ मार्च २०१९ रोजी ही घटना घडली होती़ विशेष म्हणजे, आरोपीला अशाच एका घटनेत यापूर्वीच न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती़
हिमायतनगरातील फुलेनगर येथे १६ मार्च २०१९ रोजी आरोपी बालाजी मल्हारी देवकते (वय ४३) हा सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास एका सात वर्षीय चिमुकलीला घेवून जात होता़ त्यावेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार बशीर खॉ पठाण यांनी देवकते याला हटकले़ मुलीला कुठे घेवून जात आहे अशी विचारणाही केली़ त्यावर आरोपी देवकते याने मुलगीच माझ्या पाठीमागे येत असल्याचे उत्तर दिले़ त्यानंतर मुलीला घेवून आरोपी देवकते शेतात पोहोचला़ या ठिकाणी आरोपी देवकते याने सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला़ या प्रकरणात पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात बालाजी देवकते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़
या प्रकरणाचा खटला भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालला़ सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले़ सबळ साक्षी- पुराव्याच्या आधारे न्या़ एम़ एस़ शेख यांनी आरोपी बालाजी देवकते याला मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकार पक्षाच्या वतीने अॅड़ रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली़ पोउपनि डी़ एस़ काळे यांनी तपास केला़ तर काकडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून मदत केली़
बाललैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे
आरोपी बालाजी देवकते याच्याविरोधात हिमायतनगर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत़ त्यातील पहिल्या खटल्यात भोकर न्यायालयाने देवकते याला मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला होता़ त्यानंतर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या खटल्याच्या सुनावणीत आरोपी देवकते याला मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे़