नांदेडमध्ये लाडक्या बहिणीची ओवाळणी लाटणारा आरोपी पोलिसांना शरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 01:28 PM2024-10-05T13:28:39+5:302024-10-05T13:29:32+5:30
सीएससी सेंटर चालक सचिन थोरात हा ऑनलाइन अर्ज भरत असताना त्याने अनेक बहिणींची कागदपत्रे वापरून त्यांना पुरुषांचे बँक पासबुक व आधार जोडून मोठी रक्कम हडप केली.
हदगाव (जि. नांदेड) : लाडक्या बहिणीची कागदपत्रे वापरून लाडक्या भावाच्या खात्यावर ओवाळणी जमा करून तीन लाख १९ हजार रुपये लुटून सीएससी केंद्राला टाळा ठोकून फरार झालेला आरोपी सचिन भुजंग थोरात हा स्वतः मनाठा पोलिसांना गुरुवारी रात्री उशिरा शरण आला. ४ ऑक्टोबर रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओवाळणी म्हणून महिन्याला दीड हजार रुपये दिले. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमाही केले. त्यानंतर एकच गडबड सुरू झाली. अनेक बहिणींचे अर्ज त्रुटींमध्ये आल्याने त्यांना लाभ घेता आला नाही. तर काही लाडक्या बहिणींनी कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर त्यांना एकदाच तीन हप्ते आले.
दरम्यान, सीएससी सेंटर चालक सचिन थोरात हा ऑनलाइन अर्ज भरत असताना त्याने अनेक बहिणींची कागदपत्रे वापरून त्यांना पुरुषांचे बँक पासबुक व आधार जोडून मोठी रक्कम हडप केली. या पुरुषांना विहिरीचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत, असे सांगून पैसे उचलून घेतले. ‘लोकमत’ने हा घोटाळा उघड केल्यावर राज्यात खळबळ उडाली. तेव्हापासून आरोपी सचिन थोरात पसार झाला होता. रात्री उशिरा तो स्वतः पोलिसांना शरण आला. पोलिस चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला आहे.