आचारी, बँडवाले आर्थिक विवंचनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:38+5:302021-04-25T04:17:38+5:30
चोरंबा येथील यात्रा रद्द अर्धापूर : चोरंबा येथील खंडोबाची यात्रा यावेळी कोरोनामुळे रद्द ...
चोरंबा येथील यात्रा रद्द
अर्धापूर : चोरंबा येथील खंडोबाची यात्रा यावेळी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी २४ एप्रिल रोजी यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात येते. यानिमित्त विविध कार्यक्रमही घेतले जातात; मात्र यावेळी कोरोनामुळे सदर यात्रा रद्द करण्यात आली आहे.
किनवट तालुक्यात लसीचा तुटवडा
किनवट : तालुक्यातील ४५ ते ५९ वयोगटातील ८० हजार ७७२ लाभार्थी असून त्यापैकी २२ हजार ५७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्राने दिली आहे. दुसरीकडे लसीचा तुटवडा ही बाब गंभीर बनली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मोकाट फिरणाऱ्यांवर मालेगावात कारवाई
मालेगाव : राज्य शासनाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध केले आहेत. मालेगावात नियम मोडणाऱ्या दुकानदार व मोकाट विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर महसूल विभाग व पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
वसुंधरा दिनानिमित्त
कंधारात वृक्षलागवड
कंधार : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त कंधार येथे वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, माजी जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर यांच्यासह इतरांची यावेळी उपस्थिती होती. वसुंधरा दिनानिमित्त नैसर्गिक संसाधने जपण्याचे आवाहन करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावाने फुलवळ यात्रा रद्द
फलवळ : येथील श्रीक्षेत्र महादेव देवस्थान येथे दरवर्षी आमलीबारस निमित्त पाच दिवसांची मोठी यात्रा भरत असते. मालेगाव यात्रेनंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने यात्रा रद्द करण्याचा निर्णय संयोजकांनी यावेळी घेतला आहे.
नरसी येथे संचारबंदीस चांगला प्रतिसाद
नरसी : नायगाव तालुक्यातील नरसी येथे जनता संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नरसीतील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी औषधी दुकाने व दवाखाने वगळता कोणताही व्यवसाय चालू राहता कामा नये, असा निर्धार करुन सात दिवसांची संचारबंदी सुरू केली आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्वतंत्र ऑक्सिजन प्लॉन्ट हवा
लोहा : तालुक्यातील कोविड रुग्णाच्या संख्येत वाढ होत असताना राज्यात होणारा ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता आ. श्यामसुंदर शिंदे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे लोह्यात स्वतंत्र ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट देण्यात यावा, अशी मागणी यावेळी केली.
माहूरचे प्रशासन उतरले रस्त्यावर
माहूर : तालुक्यात कोरोना आवाक्याबाहेर जात असल्याने प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. सकाळी ११ वाजेनंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. मुख्याधिकारी विद्या कदम, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी व्यापाऱ्यांना शेवटची संधी दिल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. यामुळे दिवसभर सर्व व्यापार बंद होता.