नेत्यांना गावबंदीची धास्ती, अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी ४० मराठा आंदोलक स्थानबद्ध
By शिवराज बिचेवार | Published: April 22, 2024 01:50 PM2024-04-22T13:50:23+5:302024-04-22T13:50:53+5:30
मराठा आंदोलनाच्या संदर्भात महादेव पिंपळगाव येथील आंदोलक सुरुवाती पासूनच आक्रमक आहेत.
नांदेड - नांदेड जिल्हयातील महादेव पिंपळगाव येथे आज भाजपा खासदार अशोक चव्हाण यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. पण त्यापूर्वी अर्धापूर पोलीसांनी गावातील 40 मराठा आंदोलकांना रात्रीच नोटीस देऊन सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार 40 मराठा आंदोलक सकाळी नोटीस घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांना सभा संपेपर्यंत पोलीसांनी स्थानबद्ध केले. मराठा आंदोलकाना स्थानबद्ध करुन अशोक चव्हाण यांची सभा महादेव पिंपळगाव येथे पार पडली.
मराठा आंदोलनाच्या संदर्भात महादेव पिंपळगाव येथील आंदोलक सुरुवाती पासूनच आक्रमक आहेत. गावात कोणत्याच पक्षाच्या नेत्याने सभा घेऊ नये अशा आशयाचे निवेदन देखील मराठा आंदोलकांनी पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. त्यामूळे अशोक चव्हाण यांच्या सभेदरम्यान मराठा आंदोलक गोंधळ घालतील या शक्यतेने अर्धापूर पोलीसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली. अशोक चव्हाण यांची सभा संपल्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली.