जादा दराने बियाणे विक्री केल्यास कारवाई : कृषी सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:30+5:302021-06-23T04:13:30+5:30
व्यापार्यांच्या बैठकीत कृषी, पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पा. रावणगावकर यांनी केली सूचना नांदेड : बाजारपेठेत सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे ...
व्यापार्यांच्या बैठकीत कृषी, पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पा. रावणगावकर यांनी केली सूचना
नांदेड : बाजारपेठेत सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत असून, व्यापार्यांनी सोयाबीन बियाण्याची उपलब्धता वाढवावी, तसेच जादा दराने विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी कृषी विक्रेत्यांच्या बैठकीत केली.
रावणगावकर यांनी २२ जून रोजी नवा मोंढा भागातील संतोष बीज भांडार, बालाजी कृषी सेवा केंद्र, मामडे कृषी सेवा केंद्र, आदी दुकांनाना भेट देऊन व्यापार्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या कार्यालयात व्यापार्यांची बैठक घेतली.
यावेळी रावणगावकर म्हणाले, सोयाबीन बियाण्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून, इतर बियाण्यांप्रमाणे छापील किंमत स्थिर राहत नाही. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. छापील किंमत स्थिर ठेवण्याबाबत बुधवारी होणार्या जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव घेऊन शासनास पाठविण्यात येईल. व्यापार्यांनी रासायनिक खताची विक्री ई-पॉस मशीनद्वारे करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सोयाबीनसोबतच तूर, मूग, उदीड, कापूस आदी बियाण्यांच्या उपलब्धतेबाबतचा आढावा रावणगावकर यांनी यावेळी घेतला. शेतकर्यांनी शंभर मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, येत्या दोन -तीन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. यावेळी सोयाबीन बियाणे पुुन्हा उपलब्ध होणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकर्यांनी तूर पेरण्यास प्राधान्य द्यावे, असे यावेळी चलवदे यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चलवदे, जिल्हा गुुणनियंत्रण अधिकारी जी. व्ही. गिरी, प्रभारी मोहीम अधिकारी जी. एन. हुंडेकर, तालुका कृषी अधिकारी आर. सी. राऊत, विक्रेते मधुकर मामडे, विपीन कासलीवाल, आदींंची उपस्थिती होती.
.......................