नांदेडमध्ये वर्षभरात १२ हजाराहून अधिक ट्रिपलसीट दुचाकीस्वारावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 04:28 PM2020-11-20T16:28:59+5:302020-11-20T16:30:28+5:30
वाहतुक शाखेच्यावतीने विशेष मोहिम राबविल्याने महाविद्यालय तसेच खासगी कोचिंग क्लासेस परिसरात दुचाकीवर ट्रिपलसीट अथवा नियमबाह्य दुचाकी चालविणार्यांची संख्या घटली.
नांदेड : नांदेड शहर व परिसरात दुचाकी चालकांसह ऑटोचालकांवर नियमितपणे कारवाई मोहिम राबविली जाते. त्यातून वर्षभरात जवळपास १२ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. वाहतुक शाखेच्यावतीने विशेष मोहिम राबविल्याने महाविद्यालय तसेच खासगी कोचिंग क्लासेस परिसरात दुचाकीवर ट्रिपलसीट अथवा नियमबाह्य दुचाकी चालविणार्यांची संख्या घटली. त्यातूनच महिन्याकाठी १२०० ते १५०० दुचाकीऐवजी आता ६०० ते ८०० दुचाकी तसेच इतर वाहनांवर कारवाई होत आहे.
नांदेड वाहतूक शाखेच्यावतीने काही दिवसांपूर्वी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रिपलसीट, बुलेटला आवाजाचे सायलेंसर बसविणे, स्टंट करणे, कट मारणे, फ्ॅन्सी नंबर प्लेट बसविणे अशा दुचाकीस्वारांविरोधात कारवाई मोहिम राबविली होती. यातून लाखो रूपयांचा दंड वसुल करण्यात आला होता. त्याचबरोबर काही तरूणांच्या दुचाकीही जप्त केल्या होत्या. त्यामुळे शहरात नियमबाह्यरित्या दुचाकी चालविणार्यांवर पोलिसांची वचक बसली आहे. परिणामी सध्या ट्रीपलसीट तसेच नियमांचे उल्लंघन करणार्यांची संख्या घटली आहे. मागील दहा महिन्यात वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत १० हजाराहून अधिक दुचाकीस्वारांकडून जवळपास १५ लाख रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. त्यात ऑक्टोबर महिण्यात ८५० दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही भाग्यनगर, आनंदनगर रस्त्यावर करण्यात आली आहे.
भाग्यनगर रस्त्यावर ट्रिपल सीट वाहने भरधाव
भाग्यनगर, आनंदनगर या परिसरात सर्वाधिक प्रमाणात विद्यार्थी राहतात. सध्या कोरोनामुळे संख्या कमी असली तरी दुचाकीवर ट्रीपलसीट जाणे तसेच स्टंट करणे हे प्रकार सुरूच आहेत. त्यात वजिराबाद, गुरूद्वारा चैारस्ता परिसरात रात्रीला दुचाकीस्वार स्टंट करताना आढळून येतात.
१० महिन्यांत १५ लाख दंड केला वसूल
मागील दहा महिन्याच्या कालावधीत वाहतूक शाखेने जवळपास १५ लाख रूपये दंड वसुल केला. यात दुचाकीवर ट्रीपलसीट, विनापरवाना वाहन चालविणे, कागदपत्रे सोबत न ठेवण, वाहन नो पार्कींगमध्ये लावणे यासह विविध नियमांचे उल्लंघन करणार्यांचा समावेश आहे.
ऑक्टोबरमध्ये ८५० नागरिकांकडून दंड
दुचाकी चालवितांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेच्यावतीने ऑक्क्टोबर महिन्यात जवळपास साडेआठशे दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक २२० केसेस भाग्यनगर, आनंदनगर या रस्त्यावरील आहेत. सध्या काॉलेज सुरू नसले तरी दुचाकीस्वार सुसाट धावत आहेत. त्यात स्टंटबाजी करणार्या टोळक्यांची संख्या अधिक आहे. तसेच तरोडा नाका, आयटीआय चाैक, वजिराबाद चाैरस्ता या ठिकाणीही नियम तोडणार्या, नो पार्किंग अशा वाहनांवर कारवाई केली जात आहे.
लायसन्स नसल्यास पाल्यास गाडी देवू नये
ट्रीपलसीट सहसा नवतरूण, विद्यार्थी असतात. नियम तोडणारे अथवा ट्रीपलसीट, स्टंट करणारे अशांविरोधात पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात कारवाई करून दंड वसुल केला जातो. पालकांनी लायसन्स नसल्यास पाल्यास गाडी देवू नये, तसेच दुचाकी चालविण्याबाबत योग्य तो समज देवूनच दुचाकी ताब्यात द्यावी.
- चंद्रशेखर कदम, पोलीस निरिक्षक