विनातिकीट ३७५ प्रवाशांवर कारवाई
By Admin | Published: July 2, 2017 12:19 AM2017-07-02T00:19:41+5:302017-07-02T00:21:44+5:30
नांदेड: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली होती़ या अंतर्गतच विभागाने अनेक गाड्यांमध्ये तपासणी केली़ त्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३७५ प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़
वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, प्रदीप कुमार, अंजी नायक यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला़ पहाटे चार वाजता तिकीट तपासणी मोहीम सुरु करण्यात आली होती़ यात नांदेड ते परभणी, परभणी ते जालना, परभणी ते परळी अशा विविध भागांत धावणाऱ्या रेल्वेमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात बसेस, जीप चा वापर करण्यात आला. अचानक धाड पडल्याने विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणले असून यात तब्बल ३७५ विनातिकीट प्रवासी सापडले. तसेच ४८ अनियमित प्रवासी सापडले तर १०४ जणांवर परवानगी शिवाय जास्त साहित्य घेऊन जाण्यामुळे कार्यवाही करण्यात आली. यातही तीन प्रवाशांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या विना तिकीट प्रवाशांकडून एका दिवसातच १ लाख ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे़
या कारवाईत २४ सहायक सुरक्षा अधिकारी, २४ तिकीट तपासनीस, ५ कार्यालयीन कर्मचारी, ५ वाणिज्य निरीक्षक, दोन वाहतूक निरीक्षक, १२ रेल्वे पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते़
नांदेड, परभणी व जालना मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासणी पूर्ण झाल्या नंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी अकोला ते पूर्णा मार्गावरील गाड्यांच्या तपासणीकडे वळले़