नंदीग्रामला थर्ड एसीचा भुर्दंड टाळण्यासाठी चेअर कार कोच जोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 08:08 PM2024-08-22T20:08:33+5:302024-08-22T20:08:46+5:30
थर्ड एसीचे रिझर्व्हेशन केले तरी झोपून न जाता बसूनच जावे लागते.
किनवट : नंदीग्राम एक्स्प्रेसने किनवटहून छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. झोपून न जाता बसूनच जावे लागते. वातानुकूलित, स्लीपरच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. या प्रवासाने पन्नास टक्के भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागत आहे. त्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेसला चेअर कार कोच बसवण्यात यावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
किनवटमार्गे नांदेड - दिल्ली, दुपारच्या वेळी नांदेड - नागपूर इंटरसिटी, आदिलाबाद ते हैदराबाद इंटरसिटी, आदिलाबाद ते शिर्डी ह्या नव्याने गाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे. आदिलाबाद ते नांदेड या लोहमार्गावर रेल्वेविषयक अनेक मागण्या प्रलंबित असताना आता नव्या मागण्या प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.
किनवट ते छत्रपती संभाजीनगर थर्ड एसीचे तिकीट ७५० रुपये आहे. थर्ड एसीचे रिझर्व्हेशन केले तरी झोपून न जाता बसूनच जावे लागते. बलाहरशाह ते मुंबई या नंदीग्राम एक्स्प्रेसला चेअर कार कोच बसवण्यात आला तर साधारणपणे तीनशे ते साडेतीन रुपये मोजावे लागतील. आज मात्र ७५० रुपये मोजावे लागत असल्याने ३०० रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागतो. स्लीपरलाही सेकंड सिटिंग बसवले, तर ३५० रुपयांऐवजी १५० रुपयांत छत्रपती संभाजीनगरला जाता येईल. आदिलाबाद शिर्डी रेल्वे सुरू झाली, तर शिर्डी येथे दर्शनासाठी जाणे भाविकांना सोयीचे होईल.
नंदीग्राम एक्स्प्रेसचा तत्काळ कोटा वाढवा
पूर्वी थर्ड एसी तत्काळचा कोटा ३० होता. आता तो १७ वर आला आहे. टू टायर एसीचा कोटा ८ होता, तो आता २ वर आला आहे. एच वनचा कोटा गायब झाला आहे. मुंबईचे तिकीट काढायचे झाल्यास वेटिंगच दाखवते. त्या उलट मुंबईवरून येणाऱ्यास एचए-वनचे तिकीट मिळते.
कृष्णा एक्स्प्रेसला टू एसी व फर्स्ट एसी कोच हवा
आदिलाबाद ते तिरूपती कृष्णा एक्स्प्रेसला केवळ थर्ड एसी कोच आहेत. एचए-वन व सेकंड एसी कोच नाहीत. तिरूपती येथे फस्ट क्लास व सेकंड एसीने प्रवास करणारे प्रवासी अधिक आहेत. एचए कोच बसवला तर त्यात सेकंड एसीने प्रवास करणे प्रवाशांना सोयीचे होईल. या सर्व मागण्यांकडे दक्षिण मध्य रेल्वेने लक्ष देण्याची मागणी किनवटकरांनी केली आहे.