टरबुजांवर थंडीचा घाला; केळीचे पीक गेले कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:54 AM2019-02-11T00:54:48+5:302019-02-11T00:56:28+5:30
मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.
अर्धापूर/पार्डी : मागील काही दिवसांपासून कमी- जास्त प्रमाणात थंडीची लाट कायम राहिल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील टरबूज व केळी पिकांना फार मोठा फटका बसला आहे.
तालुक्यात गतवर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे हातातोंडाशी आलेले शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत़ त्यामुळे शेतकºयांना खूप मोठा आर्थिक फटका बसत असून शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
गतवर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला होता़ त्यामुळे तालुक्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली़ परिणामी शेतकरी मोठ्या पिकांना फाटा देत लहान पिकाकडे वळले. भाजीपाला व टरबूज पिकाची निवड केली़ या परिसरातील शेतकºयांनी टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, मागील काही दिवसांत सातत्याने थंडीची लाट असल्याने या पिकाच्या वाढीत व फळधारणा वेळी परिणाम दिसून आला. महागड्या औषधीचा प्रयोग केला. फळे बाजारात विक्रीसाठी जाणार तेव्हा थंडीची लाट कायम राहिली़ त्यामुळे भावात मोठी घसरण झाली़
या वर्षात पाण्याची कमतरता भासत असल्याने शेतकरी कमी पाण्यावर व कमी दिवसांत येणाºया पिकाची लागवड करत असून त्यात प्रामुख्याने पालेभाज्या व फळपिकाची निवड करीत आहेत. तालुक्यातील निमगाव, कारवाडी, देळूब व पार्डी परिसरात मोठ्या प्रमाणात टरबूज फळाची लागवड केली आहे. हे पीक ९० दिवसांत येते़ भरपूर उत्पादन देणाºया पिकामध्ये टरबुजाचे नाव घेतले जाते. टरबूज पीक सुरुवातीला जोमात होते. जसजशी थंडीची लाट आली तसे पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई दिसत होती. शेतक-यांनी मोठ्या मेहनतीवर पीक घेतले. परंतु, मागील काही दिवसांपासून थंडीची लाट कायम असल्याने पिकाची व फळाची वाढ खुंटली आहे़ फळे लहान आकाराचे झाले असून टरबुजाच्या आतील भागात पोकळी निर्माण झाली़ त्यामुळे पिके वजनदार भरत नाहीत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशीच परिस्थिती केळीच्या बागांची दिसत आहे. केळीच्या पानावर पिवळ्या रंगाच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुसरीकडे पाने करपून गेल्याने वाढ थांबली आहे. त्यामुळे केळीची बाग कोमात गेल्याचे चित्र आहे.
नफ्यासाठी केली टरबुजाची लागवड
माझ्याकडे एक एकर जमिनीत टरबुजाची लागवड केली आहे. लहान मुलांप्रमाणे पिकाची काळजी घेतली. आता तोडणीच्या वेळी थंडी वाढल्याने फळांची वाढ थांबली आहे़ बाजारभावातही मोठी घसरण झाली आहे़ या पिकांवर कर्जाचा डोंगर कमी होईल, अशी आशा होती़ परंतु, तसे चित्र दिसत नाही.- पांडुरंग तरोडकर, शेतकरी (पार्डी)