वंचित विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 06:01 PM2020-10-23T18:01:49+5:302020-10-23T18:03:13+5:30
विद्यापीठाने उन्हाळी २०२० नवीन परीक्षा पद्धती व नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे सुरुवातीला परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ आॅक्टोबरपासून सुरु झाल्या आहेत. पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. दरम्यान, आॅनलाईन किंवा आॅफलाईन परीक्षेच्या तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिले असतील तर अशा विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येईल,अशी माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिली.
विद्यापीठाने उन्हाळी २०२० नवीन परीक्षा पद्धती व नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे सुरुवातीला परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु आता ११४ केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे चालू आहेत. आॅनलाईन परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवून समुपदेशन करण्यासाठी महाविद्यालयनिहाय आय.टी. को-आॅडीर्नेटर नेमण्यात आलेले आहेत. असे एकूण ५४८ आय.टी. को-आॅडीर्नेटर आॅनलाईन परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करीत आहेत.
या पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी एकूण जवळपास ५० हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यापैकी ५० टक्के विद्यार्थी आॅनलाईन व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी आॅफलाईन परीक्षा देत असल्याचेही कुलगुरू डॉ.भोसले यांनी सांगितले. काही तांत्रिक अडचणीमुळे १६ आॅक्टोबर रोजीचे रद्द झालेले पेपर १७ आॅक्टोबर रोजी घेण्यात आले. आणि १७ आॅक्टोबर रोजीचा रद्द करण्यात आलेला पेपर २८ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.