कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत प्रशासन सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 01:02 AM2019-07-04T01:02:29+5:302019-07-04T01:02:59+5:30
महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याच्या मुदतवाढीच्या विषयात महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी सकारात्मक भूमिका घेत रिक्त जागावर कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना सामावून घेण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
नांदेड : महापालिकेतील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याच्या मुदतवाढीच्या विषयात महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी सकारात्मक भूमिका घेत रिक्त जागावर कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना सामावून घेण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. बुधवारी कंत्राटी अभियंत्यांनी आपल्या मुदतवाढीच्या विषयात आयुक्त माळी यांची भेट घेतली.
महापालिकेत कार्यरत असलेले जवळपास १३ कनिष्ठ अभियंते, २७ रोड कारकून, कंत्राटी डॉक्टर, माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांची मुदतवाढ रखडली आहे.
कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याच्या मुदतवाढीच्या विषयावरुन सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना ज्या योजनेसाठी घेतले होते, त्या योजना संपल्या असून या कंत्राटी अभियंत्यांना मुदतवाढ द्यायची का? असा प्रश्न पुढे आला होता.
याबाबत प्रशासनाने शासनाचेही मार्गदर्शन मागवण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. मुदतवाढ रखडल्यामुळे कनिष्ठ अभियंते आर्थिक संकटात सापडले होते. या अभियंत्यांनी बुधवारी आयुक्त माळी यांची भेट घेवून आपल्या अडचणी मांडल्या.
यावेळी आयुक्तांनी कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यासह इतर कंत्राटी कर्मचाºयांच्या बाबतीत मनपा प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगितले. रिक्त पदांची संख्या लक्षात घेता कर्मचाºयांची गरज आहे. त्यामुळे कंत्राटींना सेवेत सामावून घेण्याची भूमिका असल्याचे सांगितले. आयुक्तांच्या या भूमिकेचे कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांनी स्वागत केले आहे.