आरटीई प्रवेशासाठी प्रशासनाची दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:46 AM2019-06-27T00:46:49+5:302019-06-27T00:48:49+5:30
आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यातून दुसऱ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २७ जून ही अंतिम मुदत आहे़ मात्र मागील चार दिवसांपासून नांदेडचे गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने ही प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे़
नांदेड : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव कोट्यातून दुसऱ्या फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २७ जून ही अंतिम मुदत आहे़ मात्र मागील चार दिवसांपासून नांदेडचे गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने ही प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे़ त्यांच्या गैरहजेरीत संबंधित अधिकाऱ्यांनीही प्रवेश प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे शेवटच्या दिवशी पालकांची प्रमाणपत्र पडताळणीसाठी धावपळ उडणार आहे़ प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला़
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थ सहायित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्यातून दुसºया फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची मुदत गुरूवारी संपत आहे़ ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे़ अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात केली जात आहे़ मात्र, गेल्या चार दिवसांपासून गटशिक्षणाधिकारी रूस्तुम आडे हे रजेवर आहेत़ या दरम्यान अनेक पालक आपल्या पाल्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत होते़ मात्र त्यांच्या गैरहजेरीत कोणताही अधिकारी ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पुढे येत नव्हता़ त्यामुळे पालकांना परत जावे लागत होते़ बुधवारी काही संतप्त पालकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात जाऊन आमच्या मुलांचे प्रवेश न झाल्यास कोण जिम्मेदार राहणार, शेवटच्या दिवशी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे शक्य आहे का, असे प्रश्न विचारून संबंधितांना धारेवर धरले़
मागील चार दिवसांपासून आम्ही पंचायत समितीला चकरा मारत आहोत. मात्र या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी नसल्याने आमचे काम झाले नाही़ सध्या पेरणीचे दिवस असून शेतातील कामे सोडून आम्ही या कामासाठी दिवसभर या कार्यालयात थांबत आहोत़ रजेच्या काळात एखादा अधिकारी या कामासाठी नियुक्त करणे गरजेचे असल्याचे पालकांनी सांगितले़ दरम्यान, पंचायत समिती सभापती सुखदेव जाधव यांनी गुरूवारी शेवटच्या दिवशी प्रवेशप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या़
पहिल्या फेरीत २३२५ विद्यार्थी निवडले
आरटीईअंतर्गत २५ टक्के कोट्यातून पहिल्या फेरीत २ हजार ३२५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती़ त्यापैकी १ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला़ ५ अपात्र झाले असून ६७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही़ पहिल्या फेरीत एकूण ३ हजार २५१ प्रवेशक्षमता होती़ तर ३२३८ जागा रिक्त होत्या़
जिल्ह्यात एकूण १२ हजार ९१८ जागा आहेत़ त्यापैकी २५ टक्के कोट्यातील ३ हजार २५१ जागा आरटीईसाठी आहेत़ गरिबांच्या मुलांना मोठ्या शाळेत प्रवेश मिळत आहे़
नांदेड शहरात ६१९ जणांचे प्रवेश
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थसहायित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्याची पहिली यादी मे मध्ये जाहीर झाली होती़ नांदेड शहरातील जागांची क्षमता ६३५ होती़ त्यापैकी ६२९ जागेवर ६१९ विद्यार्थी निवडले़ त्यातील २१३ जणांनी प्रवेश घेतला नाही़
दुस-या यादीची प्रवेशप्रक्रिया २७ जून रोजी पूर्ण होईल़ त्या नंतर उर्वरित जागेसाठी प्रवेशप्रक्रिया होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून सांगण्यात आली़ शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालक धडपड करीत आहेत़ प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कागदपत्रांची पडताळणी केली जाते़
गटशिक्षणाधिकारी दोन दिवस रजेवर होते़ तसेच बुधवारी ते औरंगाबादला सुनावणीसाठी गेले होते़ त्यामुळे पालकांची गैरसोय झाली़ मात्र २७ जून रोजी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल़ यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत़ - सुखदेव जाधव, सभापती, पं़ स़ नांदेड