कॅन्सरमुक्त नांदेडसाठी प्रशासन सरसावले; पाच लाख महिलांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:05 PM2018-07-17T12:05:12+5:302018-07-17T12:12:40+5:30
जिल्हाभरातील पाच लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
नांदेड : वेळीच कॅन्सरचे निदान झाल्यास योग्य ते उपचार करुन रुग्णांचे प्राण वाचविता येऊ शकतात. त्यामुळेच जिल्हाभरातील पाच लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत कॅन्सर आढळून येणाऱ्या रुग्णावर डीपीसीच्या माध्यमातून जनआरोग्य अभियानाद्वारे मोफत उपचार करण्यात येणार असून कॅन्सरमुक्त नांदेडसाठी ही मोहीम जिल्हाभरात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बहुतांश कॅन्सरचे रुग्ण तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात आढळतात. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढते. कॅन्सरचे निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास योग्य त्या औषधोपचाराद्वारे कॅन्सरवर यशस्वी उपचार होवू शकतात. या अनुषंगानेच जिल्ह्यातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची मुखेड तालुक्यात सुरूवात करण्यात आली. मुखेड तालुक्यातील चांडोळा आणि बेटमोगरा या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासणी केली असता ६७५ रुग्ण संशयित म्हणून आढळले. या संशयितांच्या तपासणीसाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून त्यांचे पुन्हा स्क्रनिंग करण्यात आले.
या तपासणीत ५२ संशयित रुग्ण आढळून आले तर १५ रुग्ण अगोदर कॅन्सर झालेले होते. यावरुन कॅन्सर आजाराची तीव्रता लक्षात येते. त्यामुळेच प्रशासनाने जिल्ह्यात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या मोहिमेसाठी आशा वर्कर्सची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीत कॅन्सरची लक्षणे आढळून आल्यास बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून पुनर्तपासणी करुन घेण्यात येणार असून तपासणीत कॅन्सरचे निदान झाल्यास संबंधित रुग्णांवर नांदेड येथे कोणार्क रुग्णालयाच्या सहकार्याने उपचार करण्यात येणार आहे. याबरोबरच आवश्यकतेनुसार रुग्णांवर मुंबई येथेही उपचार करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले़
रुग्णांवर मोफत उपचार करणार
कॅन्सरवरील उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचा असतो. त्यामुळेच या जनआरोग्य अभियानाच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर संबंधित रुग्णाला गावापासून नांदेड येथील रुग्णालयापर्यंत जाण्या-येण्याचा खर्च डीपीसीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. निदान झाल्यापासून उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्व पैसा शासकीय योजनांद्वारे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.