प्रशासन कोंडीत; पांगरपहाड, नवाखेडात मतदान न करण्यावर अडून बसले ग्रामस्थ
By प्रसाद आर्वीकर | Updated: April 26, 2024 14:12 IST2024-04-26T14:11:38+5:302024-04-26T14:12:36+5:30
३६१ मतदान असलेल्या या मतदान केंद्रावरील मतदारांनी दुपारपर्यंत मतदान केले नाही

प्रशासन कोंडीत; पांगरपहाड, नवाखेडात मतदान न करण्यावर अडून बसले ग्रामस्थ
किनवट ( नांदेड) : तालुक्यातील पांगरपहाड येथे बीएसएनएलचे नेटवर्क नाही,भौतिक सुविधांचा अभाव यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला.पण तहसीलदार डॉ.शारदा चौंडेकर यांनी मतदान झाल्याचा दावा केला आहे. नवाखेडा(घोटी) येथील आदिवासींनी स्वस्त धान्य दुकानदारावर कार्यवाही करावी यासाठी बहिष्कार टाकला होता. पण तेथे दोन मतदान झाले.दुपारपर्यंत तेथील मतदार अडूनच होते.स्वस्त धान्य दुकानदारावर कार्यवाही झाली पण त्यास मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी या मागणीवर दुपारपर्यंत तरी ठामच असल्याची माहिती हाती आली आहे.
अंबाडीतांडा येथील ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अर्धातास मशीन बंदच होती त्यानंतर मतदान सुरू झाले अशी माहिती आहे. नेटवर्क येत नाही ही नोंद तालुका प्रशासनाकडे आहे.त्यामुळे हे केंद्र 'शाडो'केंद्रा मध्ये मोडते.येथे भौतिक सुविधा नाही. बीएसएनएलचे नेटवर्क येत नाही.म्हणून चक्क गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला.सकाळी मतदान केंद्राकडे मातदारांनी पाठ फिरवली पण नंतर मतदान झाल्याचे तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
नवाखेडा(घोटी) येथील स्वस्त धान्य दुकानदाराने माहे डिसें.२०२३ व जानेवारी २०२४ या दोन महिन्यांचे धान्यच वाटप न करता काळ्याबाजारात विकले त्याच्यावर कार्यवाही करावी असे निवेदन देऊनही साधी दखल घेतली नाही असा संताप व्यक्त करत मातदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तोच स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना निलंबित केला आहे. तरी देखील मतदान न करण्याच्या भूमिकेवर खेडीवासीय ठाम होते.
अशातच सकाळी दोन मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ३६१ मतदान असलेल्या या मतदान केंद्रावरील मतदारांनी दुपारपर्यंत मतदान केले नाही. आता त्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या तहसीलच्या पुरवठा अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी तरच मतदान करू असा पवित्रा घेतला आहे.वृत्त लिहे पर्यंत तरी मतदानाकडे मतदार वळले नव्हते.