कौतुकास्पद ! नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्नीची शासकीय रुग्णालयात केली प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:28 PM2020-08-18T17:28:58+5:302020-08-18T17:32:35+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय महिला रूग्णालयात उपचारासह प्रसूतीसाठीही पत्नीला दाखल करीत वेगळा आदर्श घालून दिला़
नांदेड : शासकीय रूग्णालयांप्रती वाढणारी अनास्था पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीची शासकीय महिला रूग्णालयात झालेली प्रसूती ही शासकीय रूग्णालयांबद्दल विश्वास वाढविणारी बाब ठरली आहे़ जिल्हाधिकारी डॉ़विपीन ईटणकर यांना सोमवारी कन्यारत्न प्राप्त झाले़ विशेष म्हणजे, कोरोना संकटाच्या काळात गरोदरपण हे हायरिस्क मानले जात असताना या काळातील संपूर्ण उपचार आणि प्रसूतीही नांदेडमधील शासकीय महिला रूग्णालयात झाली़
जिल्हाधिकारी म्हणून डॉ़ विपीन हे १७ फेब्रुवारी रोजी नांदेडला रूजू झाले़ मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना संकट उद्भवले़ प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ विपीन हे अग्रभागी आहेत़ त्यात त्यांच्या पत्नी गरोदर होत्या़ जिल्हाधिकारी डॉ़ विपीन यांनी श्यामनगर येथील शासकीय महिला रूग्णालयात उपचारासह प्रसूतीसाठीही पत्नीला दाखल करीत वेगळा आदर्श घालून दिला़
शहरातील महिला रूग्णालय सुसज्ज असताना इतर ठिकाणी जायची गरजच काय? येथे तज्ज्ञ डॉक्टर उपचारासाठी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले़ महिला रूग्णालय हे १०० खाटांचे आहे़