अन्नात भेसळ केली, चार दुकानांवर फौजदारी खटले
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: February 8, 2024 07:05 PM2024-02-08T19:05:09+5:302024-02-08T19:05:25+5:30
अन्न औषध प्रशासनाने नऊ महिन्यांत घेतले २५८ अन्न नमुने
नांदेड : जिल्ह्यात अन्न व प्रशासन विभागाकडून १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान वेगवेगळ्या ५९२ आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात एकूण अन्न नमुन्यांचे २५८ सॅम्पल घेण्यात आले. त्यापैकी ४६ सॅम्पल चांगले निघाले, तर ४ नमुने असुरक्षित, ९ कमी दर्जाचे, एक मिस ब्रँडिंग आढळून आला. तपासणीदरम्यान २४ आस्थापनांमध्ये अस्वच्छता आढळून आल्याने त्यांच्याकडून १ लाख ९४ हजारांचा दंड वसूल केला आहे, तर २० आस्थापनांचे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले असून चार आस्थापनांवर फौजदारी खटले दाखल केले आहेत.
याशिवाय अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर २४ कारवाया केल्या असून, त्यांच्याकडून दोन वाहने जप्त केली, तर २० दुकाने सील करण्यात आली आहेत. संबंधितांकडून ३६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न औषध प्रशासनाकडून ३१ डिसेंबरला २१ ते ३१ डिसेंबरदरम्यान तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत २८ आस्थापनांची तपासणी करून १५ आस्थापनांचे नमुने घेण्यात आले. या नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. तसेच १ ॲागस्ट ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालाधीत ४२ दूध नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ५ कमी दर्जाचे, २ असुरक्षित, तर ९ प्रमाणित आढळून आले, तर २८ नमुने प्रलंबित आहेत.
तेलसाठा जप्त
जिल्ह्यात दिवाळी सणानिमित्त राबविण्यात आलेल्या मोहिमेत सात आस्थापनांकडून ५ लाख ६५ हजार ६१२ रुपयांचा तेलसाठा अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील तेल व्यावसायिकाचे धाबे दणाणले.
तक्रार करावी
कुठल्याही अन्नपदार्थात भेसळ वाटल्यास संबंधिताने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे ई-मेलद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन तक्रार करावी.
-संजय चट्टे, उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन, नांदेड.